कोरोना परिस्थितीवरून टीका करणं सोप्पं; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या टीकेला आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोना परिस्थितीवरून टीका करण सोपं, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असं सणसणीत प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिलं.
जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भक्कमपणे पाठराखण केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत. एकीकडे मृत्यू आणि दुसरीकडे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न, असा कैचीत मुख्यमंत्री सापडले आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे शांतपणे पर्याय मांडत आहेत. मात्र, विरोधक अशा परिस्थितीमध्येही मदत करण्याऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना आता टाळ्या वाजवण्याशिवाय काय काम उरलं आहे. सरकार आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधक करतात. पण आता विरोधकांना दाबायला वेळ कुठे आहे. तुम्हाला दाबायचे का कोरोनाला दाबायचे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
पत्नी रुग्णालयात, मुलाचा कोरोनाशी लढा, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे, अशी टीका केली होती. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. पहिली लाट आली तेव्हा, पीपीई कीट बंद केले, व्हेंटीलेटर्स बंद केले, साधनसामुग्री देणं बंद केलं. ते जे २० लाख कोटींचं बोलतायत, त्यातले महाराष्ट्राला किती कोटी आले त्याची माहिती घ्या. २० लाख कोटीमधील महाराष्ट्राला किती आले, हे जाहीर करा मग दूध का दूध और पानी का पानी होईल, मग विस्मरणाचा रोग मला झाला आहे की कोणाला झाला हे साऱ्या जनतेला कळेल, असं जोरदार प्रत्युत्तर आव्हाड यांनी फडणवीस यांना दिलं.
20 लाख कोटींचा दिंडोरा पिटता, महाराष्ट्राला काय मिळाले?
जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी 20 लाख कोटींचे पॅकेज दिले, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत भाषेत प्रत्युत्तर दिले. तुम्ही सारखा 20 लाख कोटी दिले, असा दिंडोरा काय पिटता? यापैकी किती पैसे महाराष्ट्राला मिळाले, हे प्रथम भाजप नेत्यांनी सांगावे. त्यानंतर मला विस्मरणाचा रोग झाला, असे बोलावे. विरोधक हे केवळ कांगावा करण्यात हुशार आहेत, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.