मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. यातच अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गांधी जयंतीनिमित्त आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मात्र, आता यावरून नवीन वाद पेटण्याची चिन्हे आहेत. महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून, कोण आहेत महेश मांजरेकर आणि त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान काय, असा रोखठोक सवाल केला आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर २ ऑक्टोबरच्या मुहुर्तावर महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर या नव्या चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘गोडसे’. महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसेवर महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट असणार आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान काय? असे सवाल करत लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेले नाटक असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासह जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाच्या नावाचा फोटोही शेअर केला आहे.
महेश मांजरेकरांनी सिनेमाचा टीझर शेअर करताना म्हटले आहे की, वाढदिवसाच्या सर्वांत घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही. अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे.
दरम्यान, नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिली आहे. अशा पद्धतीच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धाडस लागते. नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कोणतीही तडजोड करु नये, यावर आतापर्यंत विश्वास ठेवला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाही किंवा विरोधात बोलायचे नाही. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत, असे महेश मांजरेकरांनी यावेळी म्हटले आहे.