Top Newsराजकारण

पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र-कर्नाटकाने समन्वय ठेवण्यावर एकमत

जयंत पाटलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई/बंगळुरू : यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी शनिवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापद्धतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पद्धतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा, याची चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

२०१९ चा पूर लक्षात घेता, गतवर्षी अचूक नियोजन करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापुराचा करेक्ट कार्यक्रम केला होता. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये, यासाठी जयंत पाटील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा अक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे. मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॅमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॅमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची खास करुन अलमट्टीची याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशीही चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आजची बैठक दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, ‘कृष्णा नदी’चा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. यात कमीत कमी नुकसान कसं होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसे चांगले होईल, यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर बैठक होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल, हा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button