
मुंबई : केंद्र सरकारनं नव्या सहकार खात्याची निर्मिती केली आहे. बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाहांकडून अपेक्षा व्यक्त केलीय. रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डचं बंधन होतं ते सगळ्यांना मान्य होतं. परंतु जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे त्यामुळे या जाचातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह सहकार क्षेत्राला सोडवतील अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केलीय. तसंच शाह यांचं अभिनंदनही पाटील यांनी केलंय.
देशातील सर्व बँकींग व्यवसायावर अन्याय होतोय. त्यासाठी पवारसाहेब यासंदर्भात १ ते २ दिवसात महाराष्ट्रातील आणि देशातील बँकींग सेक्टरला आणि सहकार सेक्टरला कसं संकटात आणलेलं आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँक चालवत होते अशी माझी माहिती आहे. नोटबंदीच्या काळात जास्त नोटा एक्स्चेंज करण्यात आल्या त्यामुळे त्यांच्या बँकेचे नाव सर्वात पुढे आले होते. त्यामुळे अमित शाह यांना सहकाराचा जास्त अनुभव आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकारात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणूकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत होईल. आज रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर बंधने घातली आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घालत आहे. त्यांची स्वायत्तता धोक्यात आणलेली आहे. या सगळ्यातून अमित शाह या सेक्टरला सोडवतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केलीय.
नवीन सहकार खात्याचा महाराष्ट्राला फायदाच : दरेकर
महाराष्ट्राला सहकाराची पंरपरा लाभली आहे. राज्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सहकार आता केंद्रीय पातळीवर पोहचला असून याचा लाभ नक्कीच महाराष्ट्राला व अन्य राज्यांना होईल व महाराष्ट्राचे सहकार अधिक बळकट होईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
दरेकर म्हणाले, सहकाराचा अनुभव असलेले धाडसी नेतृत्व सहकार खाते सांभाळणार आहे. गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्यांची कार्यपद्धती उत्तम असून त्यांचा या विषयात अभ्यास चांगला आहे. अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी माझ्यासोबत त्यांनी सुमारे दोन तास सहकार चळवळीवर चर्चा केली. गावातील विविध कार्यकारणी सोसायटीपासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या सहकार सेक्टरचं त्यांना खूप ज्ञान असून सहकार विषयात ते अनुभवी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
सहकार खात्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे सोपविणे म्हणजे निश्चितच सहकार चळवळ सशक्त करणे आणि सहकाराच्या माध्यमातून राज्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देणं हाच खरा उद्देश आहे. त्यामुळे कोणावर अंकुश आणण्यासाठी या नवीन खात्यांची निर्मिती झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.