दिल्लीत शरद पवारांची अनिल देशमुखांशी महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी शुक्रवारी सकाळी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Bomb Scare), मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या सहा-जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. पवार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली.
सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. अनिल देशमुख यांची खुर्ची वाचली, मात्र मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली.
अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. त्यामुळे आता निष्पक्ष चौकशीसाठी मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून योग्यपणे सुरु आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई केली जाईल. कनिष्ठ किंवा वरिष्ठ दर्जाचा कोणताही अधिकारी असो त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.