![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/06/rain-3.jpg)
मुंबई : यंदा राज्यात मॉन्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा अधिक लवकर झालंय. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मुंबईमध्ये गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय. तसंच मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही पाऊस बरसतोय.
मुंबईजवळच्या सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार तास माध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. अजून काही तास विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या जिल्ह्यांत रेड अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जरी कारण्यात आला आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही पुढील तीन ते चार तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच चांगला पाऊस बघायला मिळत आहे. आज काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरे आणि ठाण्यासाठी वर्तवली होती. अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील २-३ दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील २४ तासात कुलाब्यात १०२ मिमी, सांताक्रुजमध्ये ३१.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज सकाळी ८.३० पासून सांताक्रुजमध्ये आतापर्यंत १६.१ मिमी पावसाची नोंद, तर कुलाब्यात १३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर देखील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. सोबतच मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आला आहे. विदर्भात देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्ध्यांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे.
पुण्यात दमदार कमबॅक
पुणे शहरात देखील पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचं दमदार कमबॅक केल्याने काही वेळातच शहरात सर्वत्र सुखद गारवा निर्माण केला आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.