पुणे : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र आणि जोमाने लढणार असल्याचं सांगतात. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत. अशातच त्यांनी अकोल्यात बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतही इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील ‘फॉर्म्युल्या’बाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता आताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्यात अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी १४५ ची मॅजिक फिगर लागते. ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो, असं अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत स्थापन केलं आहे. हे तिघे नेते जोपर्यंत सरकारच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार भरभक्कम आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय. शिवसेना असेल किंवा काँग्रेस प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचंही अजितदादा म्हणाले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारीसंदर्भात बैठक पार पडली. अजित पवार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरुन घेतलेल्या भूमिकेबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकार समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. यासोबतच उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केलंय, असं पत्रकारांनी विचारलं असता सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं म्हटलं आहे ना, असा सवाल अजित पवार यांनी केला. तर दुसरीकडे असं बोलणारेही लोकप्रतिनिधीचं आहेत ना, असं देखील अजित पवार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलंय. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला कायदा करण्याची मागणी केलीय. उद्या कोल्हापूरमधे होणाऱ्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर नेते भूमिका मांडतील. जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल. हे सरकार आल्याने विरोधी पक्षातील अनेकांच्या पोटात दुखणे थांबलेले नाही. आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत ते वेळ काढतायत. दुटप्पी भूमिका घेतायत, असे अजित पवार म्हणाले.
राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्यासंदर्भात कालपासून बातम्या सुरू आहेत. राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप होणे खूप गंभीर आहे. सगळ्यांनी त्याला देणगी दिली आहे, यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे, असेही अजित पवार म्हणाले.