राजकारण

इस्रायल- पॅलेस्टाइनदरम्यान युद्धविरामाची घोषणा; १० दिवसात २४४ जणांचा मृत्यू

तेल अवीव : इस्रायल- पॅलेस्टाइन यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून झालेल्या संघर्षानंतर युद्धविरामाच्या दिशेने वाटचाल सुरु झालीय. इजिप्तमधील मध्यस्थी करणारे अधिकारी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सर्वाधिक हानी झालेल्या गाझा पट्टीमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर दोन्ही बाजूने हल्ले थांबवण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाय. या युद्धविरामाच्या घोषणेनंतर गाझा पट्टीतील पॅलेस्टीनी नागरिकांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केलाय. मागील ११ दिवसांपासून या भागामध्ये इस्रायलकडून जवळजवळ रोज हल्ले केले जात होते. मशीदींच्या भोग्यांवरुन सॉर्ड ऑफ जेरुसलेमच्या युद्धात प्रतिकाराने बळजबरीवर (इस्रायल) विजय मिळवला आहे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.

शुक्रवार सुरु झाल्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये म्हणजे रात्री दोन वाजता युद्धबंदीची घोषणा हमास या पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटनेने केली. मात्र इस्रायलने अशी घोषणा केली नव्हती. इस्रायलने रात्री उशीरा एका ठिकाणी बॉम्ब हल्ला केला. मात्र दोन्ही बाजूंनी जर समोरच्या पक्षाने युद्धबंदीचं उल्लंघन केलं तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल अशी भूमिका घेतली. कौरोने म्हणजेच इजिप्तने दोन्ही बाजूच्या हल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी दोन निरिक्षक पाठवण्याची घोषणा केली.

१० मे पासून या ठिकाणी दोन्हीबाजूने एकमेकांवर हल्ले केले जात होते. जेरुसलेममधील धार्मिक ठिकाणांवर प्रवेश देण्यास इस्रायल अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप पॅलेस्टीनी नागरिकांनी केला होता. अल अक्सा मशिदीमध्ये रमझानच्या दरम्यान याच मुद्द्यावरुन हिंसा उसळून आली होती. या निर्बंधांमुळे गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टीनी नागरिकांना रमझानच्या पवित्र महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी प्रार्थना करता येणार नव्हती. मात्र शुक्रवारी गाझामध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर ईदनंतर राहिलेल्या मेजवण्यांचे आयोजन करण्यात आल्याचं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी २३२ पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ६५ मुलांचाही समावेश आहे. १९०० जण जखमी झाले आहेत. इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी पॅलेस्टाइनच्या बाजूने लढत असणाऱ्या किमान १६० जणांना खात्मा केलाय. इस्रायलमध्येही १२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. या संघर्षामध्ये गाझावर नियंत्रण असणाऱ्या हमास या पॅलेस्टीनी दहशतवादी संघटनेने आम्हाला यश मिळाल्याचं सांगत लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम असल्याचं स्पष्ट झाल्याचं म्हटलं आहे. इस्रायलमध्ये या युद्धबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button