इशान, विराटची झंझावाती खेळी; इंग्लंडवर ७ गडी राखून विजय, मालिका १-१ बरोबरीत
अहमदाबाद : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात इशान किशन आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडवर ७ विकेट्सने मात केली. यासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात १७.५ षटकांत पूर्ण केलं. विराट कोहलीने नाबाद 67 धावा केल्या, तर इशान किशनने 56 धावांची खेळी केली. ऋषभ पंतनेही 26 धावांची खेळी केली.
इंग्लडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर के एल राहुल शुन्यावर बाद झाल्याने, भारतीय संघाला पहिला मोठा झटका बसला. तेव्हा भारतीय संघाने देखील आपलं खातं उघडलं नव्हतं. सॅम करनने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डावाला सावरलं. पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विराट आणि इशान यांनी सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदने त्याला पायचीत केलं. यानंतर धावसंख्या १३० असताना १३ व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेल बाद झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने कर्णधाराला साजेसी खेळी करत ४९ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या.
सूर्यकुमार-ईशान किशनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची प्रतीक्षा अखेर संपली. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी -20 सामन्यात दोन्ही खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. शिखर धवनच्या जागी इशान किशनला घेण्यात आले, तर अक्षर पटेलच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला. नाणेफेक होण्यापूर्वी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना कॅप देण्यात आली.
विराटने आपल्या खेळीचं श्रेय आफ्रिकेचा मिस्टर 360 असलेला फलंदाज एबी डी व्हीलियर्सला (ab de villiers) दिलं. गेल्या काही सामन्यांपासून विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. तो सलग 2 वेळा शून्यावर बाद झाला होता. “मी बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं. संघाच्या विजयात मी योगदान दिलं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे मी 70 धावांच्या खेळीपेक्षा संघाचा विजय झाला यासाठी आनंदी आहे. मी प्रत्येक चेंडूवर लक्षं ठेवलं. अनुष्का माझ्यासोबत इथे आहे. ती माझ्या पाठीशी आहे. मी या सामन्याआधी एबीसोबत चर्चा केली. त्यावर मला एबीने फक्त चेंडूवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. मी त्याचा सल्ला मानला. त्याने सांगितलं तसं केलं”, असं म्हणतं विराटने आपल्या खेळीचं श्रेय एबीला दिलं.
आमच्यासाठी हा चांगला सामना राहिला. आम्ही अपेक्षित त्या सर्व बाबतीत चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी सामन्यातील अखेरच्या 5 ओव्हरमध्ये फक्त 34 धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडला 170 च्या आत रोखण्यात यश आले. विशेष करुन वॉशिंग्टनने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने बांधून ठेवलं, असं म्हणत विराटने सुंदरचं कौतुक केलं. सुंदरने या सामन्यातील 4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
“सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं होतं. चेंडू कमी उसळत होता. इशानने अफलातून फलंदाजी केली. मी चांगली कामगिरी करण्याचे शंभर टक्के प्रयत्न केले. पण इशानने इंग्लंडला विजयापासून दूर ठेवलं. इशान पदार्पणात शानदार खेळला. आम्ही इशानला आंतरराष्ट्रीय गोलंदाजां विरुद्ध फटकेबाजी करताना पाहिलं आहे. इशान फटकेबाजी करत होता. पण तो जबाबदारीने खेळत होता”, असं म्हणत विराटने इशानचं कौतुक केलं.