कोल्हापूरः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव, नांदेड आणि अमरावती पेटवण्यात आली. त्यावरून अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता अमरावती दंगलीची राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोल केला. सरकार घाबरले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेत आहे. राज्य सरकार संभ्रमाचे सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार नव्हे तर हे संभ्रम सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अमरावतीमध्ये लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले. एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला. त्यात उस्फूर्तपणे मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींवरच कारवाई करण्यात आली. या अमरावती दंगलीची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.
तिकडे ४० हजार लोकांना परवानगी मिळते. मात्र, शांततेने आंदोलन करायला परवानगी नाही, अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यात देखील अदृश्यपणे काही चालले आहे. त्याचा समावेश करून जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना निवदेन पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांनी रजा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी केली. दादागिरी करून, दहशत करून लोक शांत बसणार नाहीत. तुमची दादागिरी संपली आहे, असे ते म्हणाले. सातारा येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोडीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दुसऱ्याच्या घरातील भांडणावर मला काही बोलायच नाही. पण असे नको व्हायला हवे आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे हे आजही आणि उद्याही भाजपचे आहेत. शिवेंद्रसिंहराजे आणि अतुल भोसले यांनी माझ्याशी बोलून निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.