Top Newsराजकारण

एनसीबीला मदत करण्याऐवजी भक्तांनी छातीचा कोट करुन काश्मीरात लढावे : संजय राऊत

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत. फक्त ते कश्मीर खोऱ्यात दिसत नाहीत. कश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांत भयंकर असा रक्तपात घडला आहे. सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळ्या ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरु आहे. श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांनी ठार केले. या प्राचार्या कश्मिरी शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळ्या घालून मारले. ते कश्मिरी पंडित होते. फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे. दुसरीकडे इतर राज्यांत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांच्या नाड्या आवळता येतात, पण कश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांच्या बाबतीत तेही करता येत नाही. मुंबईतील ‘एनसीबी’च्या धाडसत्रात भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्याचे समोर आले. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल, अशी फिरकी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून घेण्यात आली आहे.

सध्या भाजप सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱ्यांत निरपराध्यांच्या हत्या सुरु असताना केंद्र सरकार, भाजपचे अस्तित्व दिसत नाही. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत, जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे, असा टोला यातून लगावण्यात आला आहे. कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे. नोटाबंदी केल्यामुळे दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे उत्पादन थांबेल व अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, ते खरे ठरले नाही. त्यानंतर ३७० कलम हटवले. ३७० कलम हटवल्याने खोऱ्यातील हिंसाचारालाच आळा बसेल व पाकड्यांचे धाबे दणाणेल, असा दावा केला जात होता. तोदेखील फोल ठरला. कश्मीर खोऱ्यातील लोक जीव मुठीत धरूनच जगत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच मध्यंतरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱयांना ‘जशास तसा’ धडा शिकविण्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हय़ात ‘दंडा फोर्स’ म्हणजे खासगी आर्मी उभारावी, असे म्हटले होते. तुमचा हा ‘दंडा फोर्स’ देशातल्या गरीब आणि न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वापरण्यापेक्षा कश्मीरातील दहशतवाद्यांविरोधात वापरा. कश्मीर खोऱयात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांचे कौतुकच होईल!

हिंदुत्वाचा फुका अभिमान मिरवता, पण कश्मीरातील हिंदूंना वाचविण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. लखीमपूर खेरीतही चार हिंदू, शीख त्यांनी चिरडून मारले आणि कश्मीरातील हिंदूंना वाऱ्यावर सोडले आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक आणि हाताबाहेर जाताना दिसत आहे.

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून फुटीरतावाद्यांना जोर चढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार हे पाकड्यांचे पाप आहे व त्यांच्या मदतीने कश्मीरवर चढाई करू, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या चिंधड्या कशा उडविणार आहात ते सांगा. पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही. पुन्हा येथे नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राईक चालले नाही हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

कश्मीरच्या अतिरेक्यांना अमली पदार्थांच्या व्यवहारातून अर्थपुरवठा होतो. नोटाबंदीमुळे अमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा बसेल असे तेव्हा सांगितले. गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानातील अमली पदार्थांचा व्यवहार शंभर पटीने वाढला. महिनाभरापूर्वीच गुजरातमध्ये तीन हजार किलो ‘ड्रग्ज’ पकडले. त्याची किंमत साधारण २५ हजार कोटी इतकी आहे. कश्मीर खोऱ्यात रोज अमली पदार्थांचे साठे सापडत आहेत. जे सापडते ते दिसते. जे चलनात, व्यवहारात आले ते अदृश्यच आहे. एकंदरीत कश्मीरबाबतच्या धोरणांचा साफ फियास्को झाला आहे.

कश्मीर प्रश्नाचे नको तितके राजकारण झाले. कश्मीर हा देशातील मतपेटीचा विषय बनला. ”पाकव्याप्त कश्मीरही हिंदुस्थानला जोडू” असे सांगून मते मिळवली गेली, पण आपल्या कश्मीरात हिंदुस्थानवाद्यांना जगणे कठीण झाले आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी कश्मीरप्रश्नी आरपारची लढाई करावी, असे देशातील जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. कारण कश्मीर खोरे रोज निरपराध्यांच्या रक्ताने भिजत आहे. त्यांच्या किंकाळ्या व आक्रोशाने थरारत आहे. शिवाय अतिरेक्यांना भय उरले नाही हे तर आहेच, पण कायद्याचे राज्यदेखील खोऱ्यात अस्तित्वात नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button