मेलेल्या वाघापेक्षा जखमी वाघ अधिक खतरनाक; ममतादीदींनी भाजपला ललकारले
नंदीग्राम: नंदीग्रामच्या मैदानातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डरकाळी फोडली आहे. होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर आहे. मेलेल्या वाघापेक्षा जखमी वाघ नेहमीच खतरनाक असतो, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले आहेत.
पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघातून स्वत: ममता बॅनर्जी निवडणूल लढवत आहेत. आज त्यांनी नंदीग्राममध्ये व्हीलचेअरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपलाच थेट ललकारले. ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत. अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार असून त्यांचे नंदीग्रामवर प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांना मार लागला होता. त्यांच्या पायाला लागलं होतं. त्यामुळे त्या सध्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. आजही त्या व्हीलचेअरवर बसूनच नंदीग्राममध्ये आल्या. रणरणत्या उन्हातही त्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे.
येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे विधान केलं. माझ्या पायाला मार लागलेला आहे. तरीही मी सभेला संबोधित करत आहे. हे सर्व त्यांच्या (शुभेंदू अधिकारी) इशाऱ्यावर होत आहे. डिवचलं तर मी सोडत नाही. मी रॉयल बेंगॉल टायगर आहे. मेलेला वाघ हा जखमी वाघांपेक्षा अधिक खतरनाक असतो. मी बंगालमध्ये कोणत्याही मतदारसंघात उभे राहिले असते तर निवडून आले असते. मात्र, इतिहास घडवण्यासाठी मी नंदीग्राममध्ये उभी आहे. पुढचा मुख्यमंत्री हा नंदीग्राममधलाच असेल. नंदीग्राममध्ये घुसखोरी करणाऱ्या गुंडांपासून तो नंदीग्रामचं संरक्षण करेल. त्यामुळे बंगाल वाचवा, बंगालच्या अस्तित्वाचं रक्षण करा, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं.
गुंडांच्या माध्यमातून नंदीग्राममध्ये बुथ लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाहेरच्या गुंडांना राज्यात बोलावलं गेलं आहे. त्यांची हॉटेलात बडदास्त ठेवण्यात आली आहे. तुम्ही बुथ लुटूनच पाहा तुमची काय हालत होते ते दिसेल. यांना दंगल घडवायची आहे. त्यामुळे मी आयाबहिणींना सांगते, हे लोक दंगल भडकवण्यासाठी आले तर तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, नंदीग्राममध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील पोलीस तैनात करू नका, अशी मागणी टीएमसीने निवडणूक आयोगाला केली आहे. त्याबाबत टीएमसीने निवडणूक आयोगाला एक अर्ज दिला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातून गुंड आणले असून त्यांनी नंदीग्रामच्या विविध हॉटेलात लपवून ठेवले आहे, असा आरोपही या निवेदनात केला आहे.