पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. दहशतवाद, बेरोजगारी, राजकीय अस्थैर्य यापेक्षाही तिथे महागाईच्या भस्मासुराने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानात महागाई पाठ सोडायला तयार नाही. महागाईच्या वणव्यात सामान्य जनता होरपळून निघाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना स्वयंपाक करणेदेखील अवघड झाले आहे. पाकिस्तानमध्ये कोंबड्या आणि मांसाची किंमत अचानक वाढली आहे. त्यामुळे लोक पंतप्रधान इमरान खान यांना लक्ष्य करत आहे. मांसाशिवाय अंडे आणि आल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. रावळपिंडीत अंड्याच्या किमती 350 रुपये प्रतिडझन झाल्या आहेत, तर आल्याची किंमत एक हजार रुपये प्रति किलो झाली आहे. बिघडलेल्या आर्थिक स्थितीत पाकिस्तानमध्ये आधीच धान्य आणि पिठाची कमतरता होती. आता स्वयंपाक घरातील इतर वस्तू देखील महागल्याने सर्वसामान्य हैराण आहेत. कराचीत जिवंत कोंबड्याची किंमत 370 रुपये प्रतिकिलो आणि मांस 500 रुपये प्रतिकिलो झाले आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधील जनतेच्या मनात या महागाई विरोधात असंतोष आहे. पाकिस्तानमध्ये कच्चा माल आणि चार्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कोंबड्या आणि अंड्याच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगितले जाते. सध्या पोल्ट्री चालकांचा खर्च अधिक होत असल्याने किमती वाढल्या आहेत. काही दिवसात या किमती कमी होतील असा दावा स्थानिक विक्रेत्या संघटनांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधून भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्यानंतर इम्रान खान यांनी चलनवाढ रोखण्यासाठी बाजार समित्याच बरखास्त केल्या. त्यातच मांस आणि भाजीपालाही महागला. याशिवाय पाकिस्तानमध्ये लोकांना घरगुती गॅसही मिळेनासा झाला आहे. 2021 च्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान गॅस तुटवड्याचा सामना करत आहे. पाकिस्तानमधील महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे इम्रान खान साखरेचे दर 102 रुपयांवरुन 81 रुपये केल्याचे श्रेय घेत स्वतःच्या सरकारचे कौतुक करण्यात गुंग आहेत. त्यामुळे अशा स्थितीत सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार हाच प्रश्न आहे. सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याचे वचन देऊन सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्या सरकारसमोर महागाईने आव्हान निर्माण केले आहे. या महागाईमुळे पाकिस्तानच्या जनतेत रोष असून पंतप्रधान इम्रान खान यांची झोप उडाली आहे. या महागाईमुळे पाकिस्तानच्या जनतेत रोष असून इम्रान खान यांची झोप उडाली आहे. पाकिस्तानमध्ये पीठ, साखर यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. पाकिस्तानी चलनानुसार, पीठाचे दर प्रतिकिलो 70 रुपये झाले आहेत. दरवाढीसाठी कारणीभूत असणार्यांवर आणि साठेबाजी करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिले; परंतु त्याचा फारसा काहीच उपयोग झालेला नाही. इम्रान खान यांनी जनतेच्या व्यथा समजत असून महागाई कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ट्विटरवर म्हटले. सरकारी संस्थांनी पीठ आणि साखरेच्या दरवाढीची कारणे शोधण्यास सुरूवात केली आहे. दरवाढीसाठी जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. पाकिस्तानमध्ये एका चपातीची किंमत 12 ते 15 रुपये झाली आहे, तर साखरेचे दर सातत्याने वाढत असल्यामुळेही जनता हवालदिल झाली आहे. येत्या काही दिवसांत साखरेचा दर आणखी वाढणार असून 80 रुपये प्रतिकिलो इतका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असल्याची चर्चा आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढत असताना गॅसच्या दरातही वाढ होणार आहे. गेल्या महिन्यात खैबर पख्तुनख्वा आणि सिंध प्रांतातील वाहतूकदारांनी पेट्रोल दरवाढीविरोधात संप पुकारला होता. यामुळे सिंध प्रांतात गहू व पीठाचा पुरवठा खंडित झाला होता. त्याशिवाय कराची आणि पंजाब प्रांतातही अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली. पाकिस्तानचा सत्तारुढ पक्ष तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने महागाईसाठी विरोधी पक्ष जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी नागरिकांना ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केलेल्या इम्रान खान यांच्याविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पाकिस्तानमध्ये वीज बिल, खते, इंधन आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महागाईच्या विरोधात आणि आपल्या मागण्यांसाठी शेतकर्यांनी पंजाब प्रांतातील पाकपत्तन भागात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. सरकारने मागण्या मान्य न केल्यास लाहोर आणि इस्लामाबादमध्येही 31 मार्च रोजी ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. काही महिन्यांपूर्वी पीठाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. आता, भाज्यांच्या किंमती गगनला भिडल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये शिमला मिरचीची किंमत 200 रुपये किलो इतकी झाली आहे. या वाढत्या महागाई गरिब आणि निम्न मध्यमवर्गीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या खाद्यान्न संकट निर्माण झाल्याची स्थिती आहे. पाकिस्तानमध्ये कांद्याचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे इतर देशांकडून कांदा मागवावा लागत आहे. इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट या नावाखाली दंड थोपटले आहे. सरकारविरोधाील जाहीर सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विविध कलमाखाली कारवाईदेखील सुरू आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर चाप लावण्याच्या नादात इम्रान खान यांनी जनतेला वार्यावर सोडले असल्याचा आरोप होत आहे.