दुसरा टी-२० सामना : रोमांचक सामन्यात भारताचा विंडीजवर विजय; मालिकेत आघाडी
निकोलस पूरन-पॉवेलची फटकेबाजी व्यर्थ
कोलकाता : कोलकाता: शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने अखेर वेस्ट इंडिजवर आठ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयासह भारताने टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोव्हमॅन पॉवेलने शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. त्याने ३६ चेंडूत ६८ धावा केल्या. यात ४ चौकार आणि ५ षटकार लगावले. वेस्ट इंडिजने निर्धारीत २० षटकात ३ बाद १७८ धावा केल्या. हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमारने शेवटच्या ३ षटकात हुशारीने गोलंदाजी केली. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी भारतीय संघाचं टेंशन वाढवलं होतं. दोघांच्या वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने सामन्यात बाजी मारण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, भुवनेश्वर कुमारने त्याच्या अनुभवाच्या जोरावर हा सामना खेचून आणला. हर्षलने १८ व्या षटकात ८ धावा दिल्या, त्यानंतर भुवीनं १९ व्या षटकात फक्त ४ धावा देत १ विकेट घेतली. तिथेच विंडीजच्या हातून सामना निसटला आणि भारताने ८ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या तीन षटकात सामन्याचा निकाल बदलला.
रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. त्यानंतर रिषभने वेंकटेश अय्यरला सोबत घेऊन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित व विराट यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने २४ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट घेत भारताला धक्के दिले.
प्रत्युत्तरात विंडीजला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. फिरकी गोलंदाजीवर चाचपडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना खिंडीत पकडण्यासाठी रोहितने लगेच युझवेंद्र चहलला आणले. चहलने ६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कायल मेयर्सला ( ९) बाद केले. मालिकेत दुसऱ्यांदा चहलने त्याची विकेट घेतली. त्यानंतर रवी बिश्नोईने त्याच्या पहिल्याच ( सामन्यातील ९) षटकात ब्रेंड किंगला ( २२) बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. निकोलस पूनरला चहलने बाद केले होते, परंतु बिश्नोईने त्याचा झेल सोडला. पूरन व रोवमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना विंडीजचा डाव सावरला.
विंडीजला ३६ चेंडूंत ७२ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ८ विकेट्स होत्या. १६व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याच्याच गोलंदाजीवर पॉवेलचा झेल सोडला अन् त्यानंतर रोहितचा पारा चढला. रोहितनं चेंडूला लाथ मारल्यानंतर भुवनेश्वरकडे बघून तो रागाने काहीतरी म्हणाला. भुवीच्या त्या षटकात १० धावा आल्या. त्यानंतर दीपक चहरने टाकलेल्या १७व्या षटकात १६ धावा कुटल्या गेल्या. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल यांनी वैयक्तित अर्धशतकही पूर्ण केले. हर्षल पटेलने १८व्या षटकात ८ धावा देत सामन्यात अजूनही भारताचे आव्हान जीवंत ठेवले होते. पूरन व पॉवेल यांनी ६२ चेंडूंत शतकी भागीदारी केली. १९व्या षटकात भुवीने ही भागीदारी तोडली. पूरन ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला.
पूरन बाद झाला तेव्हा विंडीजला ९ चेंडूंत २८ धावा हव्या होत्या. भुवीने १९ व्या षटकात ४ धावा देताना १ विकेट घेतली अन् सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला. विंडीजला ६ धावांत २५ धावा करायच्या होत्या. अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा आल्यानंतर पॉवेलने पुढील दोन चेंडू सीमापार पाठवले. पण, ५ व्या चेंडूवर हर्षलने एकच धाव दिली अन् इथे भारताने बाजी मारली. पॉवेल ३६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजला ३ बाद १७८ धावाच करता आल्या. भारताने ८ धावांनी हा सामना जिंकला.
ऋषभ पंत-वेंकटेश अय्यरची फटकेबाजी
तत्पूर्वी, भारताने विराट कोहली (५२), ऋषभ पंत नाबाद (५२) आणि वेंकटेश अय्यरच्या (३३) धावांच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले. विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि वेंकटेश अय्यर जोडीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यांनी विंडिजच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं. पंतने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने २८ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली. यात ७ चौकार आणि १ षटकार होता. वेंकटेश अय्यरने १८ चेंडूत ३३ धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता. दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही.
विराट बाद झाल्यानंतर धावगती कुठे धीमी होणार नाही, याची दोघांनी काळजी घेतली. पाचव्या विकेटसाठी त्यांनी 76 धावांची भागीदारी केली. आज विराटने सुद्धा दमदार खेळ दाखवला. ४२ चेंडूत ५२ धावांची खेळी करताना विराटने सात चौकार आणि एक षटकार लगावला. विराटच्या आजच्या फलंदाजीमध्ये जुन्या कोहलीची झलक पहायला मिळाली. विराटच्या बॅटमधून बरसणाऱ्या धावा पाहून डोळ्याचं पारण फिटलं. विराटने आज सुरुवातीपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा; रोहित शर्मा नाराज
सामन्यानंतर रोहितने भुवीचे कौतुक केले. तो म्हणाला, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना नेहमी पराभवाची भीती असतेच. सामन्याच्या शेवट अविस्मरणीय झाला. या धावांचा बचाव करणे सोपं नाही, हे आम्हाला सुरुवातीपासून माहित होतं, परंतु आम्ही आखलेल्या रणनीतीची योग्य अमंलबजावणी केली. याचा मला अभिमान आहे. भुवनेश्वर कुमार जेव्हा गोलंदाजीला आला, तो क्षण अत्यंत दडपणाचा होता. पण, त्यानं अनुभवाच्या जोरावर सामना फिरवला. अनेक वर्षे भुवी हेच करत आला आहे आणि आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
रोहित पुढे म्हणाला, विराटने ज्या प्रकारे खेळ केला, त्याने माझ्यावरील दडपण कमी केले. ही महत्त्वाची खेळी होती. रिषभ व वेंकटेश यांनी शेवट दमदार केला. वेंकटेशच्या खेळीत आलेली परिपक्वता पाहून आनंद झाला. त्यात तो आत्मविश्वास दिसला आणि त्याने मला विचारलेही मला षटक टाकायला मिळेल का? क्षेत्ररक्षणात थोडासा ढिसाळपणा जाणवला. झेल सोडले नसते तर यापेक्षा चांगली कामगिरी झाली असती. पुढे जायचंय तर अशा चुका कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.