
धर्मशाळा: सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंके विरुद्धचा तिसरा टी-२० सामना सहा विकेटने सहज जिंकला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले १४७ धावांचे टार्गेट आरामात पार केले. या सामन्यातही श्रेयस अय्यर हिरो ठरला. त्याच्या ४५ चेंडूतील नाबाद ७३ धावांच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला. श्रेयसने आज अर्धशतकांची हॅट्रीक पूर्ण केली. या मालिकेत श्रेयसने एकट्याने २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी टी-२० मध्ये आतापर्यंत कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेली नाही. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजाने भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने क्लीन स्वीपची ही हॅट्रिक केली आहे.
विजयी मालिकेची याची सुरुवात न्यूझीलंडपासून झाली होती. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका. भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत बरेच बदल करुन पाहिले. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संधी दिली. सर्वच खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोन केलं. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणीच्या दृष्टीने हे बदल करुन पाहिले. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार खेळ दाखवला. यापूर्वी श्रेयसने नाबाद ५७, ७४ धावांची खेळी केली होती. आजही तोच फॉर्म कायम होता.
भारतीय संघात झालेला खांदेपालट यशस्वी ठरताना दिसतेय. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना टी-२० मालिकेत भारताने सहज लोळवले. रोहितच्या नेतृत्वाखालील हे मालिकेतील सलग तिसरे निर्भेळ यश आहे. भारताचा हा सलग १२ वा ट्वेंटी-२० विजय आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खान व मोहम्मद सिराज यांनी सुरुवातीलाच श्रीलंकेला धक्के दिले. त्यांचे ४ फलंदाज २९ धावांवर माघारी परतले असताना कर्णधार दासून शनाका पुन्हा एकदा टीम इंडियासमोर नांगर रोवून उभा राहिला. त्याने सहाव्या विकेटसाठी चामिका करुणारत्नेसह अर्धशतकीय भागीदारी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. आवेश खानने टाकलेल्या १९ व्या षटकात शनाकाने १९ धावा चोपून काढल्या. शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि श्रीलंकाने ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या.
पुन्हा एकदा दुष्मंथा चमिराने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ वेळा चमिराने रोहितची विकेट घेतली. कर्णधार ५ धावांवर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या, परंतु सॅमसनला ( १८) मोठी खेळी साकारता आली नाही. दीपक हुडाला आज पुढे पाठवण्यात आले आणि त्यानेही काही सुरेख फटके मारले, परंतु लाहिरू कुमाराने भन्नाट यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. हुडाने २१ धावा केल्या. श्रेयसने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक ठरले. वेंकटेश अय्यरलाही (५) आज संधीचं सोनं करता आले नाही.
श्रेयस आणि रवींद्र जडेजा ही मागच्या सामन्यातील स्टार जोडी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर उभी राहिली. या दोघांनी अगदी सहजतेनं भारताला विजय मिळवून दिला. भारताने ही मालिका ३-० अशी जिंकून इतिहास रचला. टी-२० त सलग १२ सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या विश्वविक्रमाशी टीम इंडियाने आज बरोबरी केली. पण, एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध टी-२० त सर्वाधिक १७ विजय मिळवून भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (१६ वि. झिम्बाब्वे) यांचा विक्रम मोडला. श्रेयस व जडेजा यांनी भारताला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. श्रेयस ४५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर, तर जडेजा २२ धावांवर नाबाद राहिले.
रोहितचा नकोसा विक्रम
रोहितच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४५ वेळा एकेरी धावसंख्येवर माघारी परणारा तो फलंदाज ठरला. त्याने आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा ( ४४) नकोसा विक्रम नावावर केला.
श्रेयस अय्यरचा पराक्रम
एका टी-२० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्ता), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.
संघातील स्थानाची चिंता करू नका..; रोहित शर्माची युवा खेळाडूंना प्रेरणा
‘सर्व आघाडींवर दमदार खेळ झाला. आम्ही एकजुटीने खेळलो आणि जिंकला. या मालिकेतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी संघाला मिळाल्या. त्या आता कायम सोबत ठेवायला हव्यात. अनेक युवा खेळाडूंना संधी दिल्याचा आनंद आहे. मी खेळाडूंना आधीच सांगितले होते, की संघातील स्थानाची चिंता करू नका. आम्हाला संघातील त्या उणीवा भरून काढायच्या होत्या आणि त्यात यशस्वी झालो. आता पुढे जायचंय… हे मोठे आव्हान आहे, परंतु सोबत फॉर्मात असलेले खेळाडू आहेत. खेळाडू मिळालेल्या संधीचं असंच सोनं करत राहिले तर संघाची ताकद दिवसेंदिवस वाढत जाईल. आम्ही मोहालीत दाखल झाल्यावर कसोटीचा विचार करण्यास सुरुवात करू, असे रोहित शर्माने सामना संपल्यानंतर सांगितले.
रोहित शर्माकडून टॉसवेळी झाली चूक !
ज्यावेळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार स्टेडियममध्ये आले होते त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून एक चूक घडली. रोहित शर्माला त्यानंतर ‘मला खूप सांभाळून बोलावं लागेल’, असं स्पष्टीकरण द्यावं लागलं.
नाणेफेक श्रीलंकेनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर समालोचक मुरली कार्तिकनं श्रीलंकेच्या कर्णधाराला प्रश्न विचारले आणि संघातील बदल विचारले. श्रींलेकचा कर्णधार शनाका यानं त्याबाबतची सविस्तर माहिती दिली. पुढे रोहित शर्माला संघातील बदलांबाबत विचारण्यात आलं असता त्यानं संघात करण्यात आलेले चार मोठे बदल सांगितले. यातच एक चुकीचं विधान रोहितनं केलं. पण त्याची चूक त्याला तिथंच लक्षात आली आणि त्यानं तातडीनं आपल्या विधानात सुधारणा करुन मिश्किलपणे मुरली कार्तिकला उत्तर दिलं. ‘इशान किशन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्यासोबतच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल देखील संघाबाहेर आहेत, असं रोहित म्हणाला. त्यानंतर तातडीनं रोहितनं आपल्या विधानात सुधारणा करत ‘माफ करा. बुमराह, चहल आणि भुवीला संघाबाहेर नव्हे, आजच्या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. मला खूप सांभाळून बोलावं लागेल, असं म्हटलं. त्यानंतर रोहित आणि मुरली कार्तिक यांच्यात हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
रोहित शर्मा नेहमीच त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी देखील चर्चेचा विषय ठरतो. त्याचे असे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत असतात. रोहित पत्रकार परिषदेतही निर्माण झालेलं गंभीर वातावरण त्याच्या मजेशीर उत्तरानं हलकं करत असतो. रोहितच्या याच हटके अंदाजाचं दर्शन आजच्या टॉसवेळी झालं.