Top Newsस्पोर्ट्स

भारताचा रवी कुमार दहिया आता सुवर्णपदकासाठी लढणार

टोक्यो : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाचा उपांत्य फेरीचा सामना भारताचा रवी कुमार दहिया आणि कझाकिस्तानचा नुरीस्लॅम सानायेव्ह यांच्यात खेळवण्यात आला. रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २-९ अशा पिछाडीवरून रवी कुमारनं शानदार कमबॅक करताना अंतिम फेरीत धडक दिली. भारताचे चौथे ऑलिम्पिक पदक निश्चित झाले आहे आणि आता रवी कुमारकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा लागल्या आहेत. २०१२ नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे.

रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली. कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. आणि नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले.

रवी कुमार दहियाने बल्गेरियाच्या खेळाडूवर १४-४ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी त्याने उपउपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या ओस्करचा १३-२ असा धुव्वा उडवला होता.

पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत २ गुण कमावले आणि विजय निश्चित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button