Top Newsस्पोर्ट्स

भारताचा दक्षिण अफ्रिकेवर ११३ धावांनी ऐतिहासिक विजय; कसोटी मालिकेत १-० ने आघाडी

सेंच्युरियन : सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य दिले होते. पण दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे ६ गडी झटपट बाद केले. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले. भारताने ११३ धावांनी विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडी घेतली आहे.

काल चौथ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या ४ बाद ९४ धावा झाल्या होत्या. आज कसोटीचा पाचवा आणि अखेरचा दिवस होता. आज सकाळी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावाला पुढे सुरुवात केली. कर्णधार डीन एल्गर आणि टेंबा बावुमाने सकारात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. एल्गर खेळपट्टीवर असेपर्यंत भारताच्या विजयाबद्दल थोडी धाकधूक वाटत होती. पण जसप्रीत बुमराहने त्याला ७७ धावांवर पायचीत पकडून भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. वियान मल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला. मल्डरने ३ चेंडूत अवघी एक धाव केली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. लगेचच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जॅनसेन १३ धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपलं खातंही खोलता आलं नाही. अवघ्या ४ धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एनगिडी दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि भारताला विजय मिळाला.

एल्गरने १५६ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. एडन मारक्रम (१), डीन एल्गर (७७), किगन पीटरसन (१७), रस्सी वॅनदर दुस्सेन (११) आणि केशव महाराज (८), क्विंटन डिकॉक (२१), वियान मल्डर (१), मार्को जॅनसन (१३) धावा करून बाद झाले. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना आपलं खातंही खोलता आलं नाही.

मैदानाचा इतिहास

विशेष म्हणजे या मैदानावर शतकभराच्या काळात केवळ एकदाच चौथ्या डावात ३०० पेक्षा अधिकच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला होता. त्यामुळे आफ्रिकेलाही हा पाठलाग कठीण जाईल, असं बोललं जात होतं. अखेर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मैदानाच्या इतिहासात एकदाच २००१-०२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत सामन्यावेळी ३०० पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button