Top Newsस्पोर्ट्स

भारताचा कसोटीतील सर्वात मोठा विजय; न्यूझीलंड ३७२ धावांनी पराभूत

मुंबई : भारतीय क्रिकेट संघानं दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारतानं ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गडगडला. भारतानं हा सामना ३७२ धावांनी जिंकला, भारताचा हा कसोटीतील सर्वात मोठा विजय ठरला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची ही दुसरी मालिका आहे आणि या विजयासह त्यांनी खात्यात १२ गुणांची भर घातली आहे. पण, ४२ गुण असूनही टीम इंडियाला क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. श्रीलंका व पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी २४ गुण असूनही ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

चौथ्या दिवशी भारतानं ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला

भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीतील विजयाची औपचारिकता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केली. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला पराभवाच्या दिशेनं ढकलले होतेच, त्यात चौथ्या दिवसात जयंत यादवनं न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. भारतानं घरच्या मैदानावर २०१३पासून सुरू असलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम राखली. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा ११वा कसोटी मालिका विजय ठरला.

भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजी करताना ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. टॉम लॅथम ( ६), विल यंग ( २०) व रॉस टेलर ( ६) यांना आर अश्विननं माघारी पाठवून किवींना मोठे धक्के दिले. हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली , परंतु अक्षर पटेलनं ही जोडी तोडली. डॅरील मिचेलला ६० धावांवर माघारी जावं लागलं. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलनं घाई केली आणि त्यालाही भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावं लागलं.

चौथ्या दिवशी जयंत यादवनं करिष्मा दाखवला. त्यानं दिवसाची पहिली विकेट राचिन रविंद्रनं घेतली. राचिन १८ धावांवर चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद होऊन माघारी परतला. त्यापाठोपाठा कायले जेमिन्सन ( ०) व टीम साऊदी ( ०) यांनाही जयंतनं विकेट घेत न्यूझीलंडला मोठे धक्के दिले. विलियम सोमरविले ( १) यादवच्या गोलंदाजीवर फसला. हेन्री निकोल्स नॉन स्ट्रायकर एंडला विकेट्स पडताना पाहत होता. अश्विननं त्याची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. न्यूझीलंडचा डाव १६७ धावांवर गुंडाळून भारतानं ३७२ धावांनी विजय मिळवला. आर अश्विन व जयंत यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. या मालिकेत १४ विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

भारतानं घरच्या मैदानावर २०१३पासून सुरू असलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा कायम राखली. भारताचा हा घरच्या मैदानावरील १४वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा ११वा कसोटी मालिका विजय ठरला. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग चौथा कसोटी मालिका विजय आहे. भारतानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध १२ कसोटी मालिका खेळल्या आणि त्यापैकी एकही गमावली नाही.

भारतानं या विजयासह जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये १२ गुण कमावले. त्यांच्या खात्यात एकूण ३ विजय, १ पराभव व २ ड्रॉ अशा निकालांसह ४२ गुण जमा झाले आहेत. भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका व पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी २४ गुण असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा वरचढ आहे. भारतानं कानपूर कसोटी जिंकली असती तर ते या क्रमवारीत पुढे गेले असते.

सचिन तेंडुलकरच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये ५० विजय मिळवणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. या विजयानंतर टीम इंडियाचे माजी खेळाडूंनी कौतुक केले, परंतु सचिन तेंडुलकरचं ट्विट चर्चेचा विषय ठरतंय. सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की, ‘या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. ही स्पेशल कसोटी मॅच ठरली, कारण चारही डावांत भारतीय गोलंदाजांनी सर्व विकेट्स घेतल्या.’

मुंबई कसोटीतील पहिल्या डावात भारतीय वंशाचा परंतु न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एजाझ पटेलनं १० विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताकडून मोहम्मद सिराज ( ३), अक्षर पटेल ( २), आर अश्विन ( ४) व जयंत यादव ( १) यांनी विकेट्स घेताना किवींचा डाव ६२ धावांवर गुंडाळला. भारताच्या दुसऱ्या डावात ७ विकेट्स पडल्या आणि त्या एजाझ पटेल (४) व भारतीय वंशाच्याच राचिन रविंद्र (३) यांनी घेतल्या. चौथ्या डावात अश्विन व जयंत यांनी प्रत्येकी चार व अक्षरनं १ विकेट घेतल्या. त्यामुळे तेंडुलकरचं ट्विट व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button