
टोक्यो : टोक्यो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. आज झालेल्या अत्यंत रोमहर्षक उपांत्यपूर्व लढतीत भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर १-० अशा फरकाने मात केली आणि ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय महिला हॉकी संघाकडून गुरजित कौर हिने केलेला एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला. ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे.
काल भारताच्या पुरुष हॉकी संघाने ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर आज भारताच्या महिला संघानेही तोडीस तोड कामगिरी केली. भारतीय महिला संघाने आज स्वप्नवत कामगिरी करताना आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियावर जबरदस्त वर्चस्व राखले. भारतीय महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दरम्यान, पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर २२ व्या मिनिटाला गुरजित कौर हिने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतराला भारताने ही आघाडी कायम राखली.
मध्यांतरानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमणाची धार वाढवत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्रा आज अभेद्य बनलेल्या भारतीय बचाव फळीने ऑस्ट्रेलियाचे सर्व हल्ले परतवून लावले. सामन्यात ऑस्ट्रेलियाला तब्बल ७ पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र त्यातील एकाही पेनल्टी कॉर्नरवर गोल होऊ शकला नाही. अखेर भारताने हा सामना १-० अशा फरकाने जिंकून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये साखळीतील पहिल्या तीन सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाने अखेरचे दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर आज भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचे पाणी पाजत उपांत्य फेरीत प्रवेश केला.