टोक्यो : टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये पुरुषांच्या भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. जवळपास ४९ वर्षांनी भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १९७२ मध्ये टीम इंडियाने हा कारनामा केला होता.
टोक्यो ऑलिंम्पिकचा आज १० वा दिवस आहे. आज पीव्ही सिंधूने कास्य पदक पटकावले. यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने आनंदाची बातमी दिली आहे. टीम इंडियाने आक्रमक खेळ करत ७ व्या आणि १६ व्या मिनिटाला ब्रिटनवर गोल नोंदविले आणि आघाडी घेतली. भारताकडून दिलप्रीत सिंग आणि गुरजंत सिंग यांनी हे गोल नोंदविले.
यानंतर ग्रेट ब्रिटनने भारताने घेतलेली बढत कमी करत पहिला गोल नोंदविला. ४५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. सॅम्युअल इयानने हा गोल केला. त्या आधी ४४ व्या मिनिटाला ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, भारतीयांनी हा गोल होऊ दिला नाही. सुरेंदर कुमार याने खुबीने गोल अडविला. यानंतर ५७ व्या मिनिटाला भारताने संधी साधून ब्रिटनवर ३-१ ने आघाडी मिळवली. हार्दिकने ५७ व्या मिनिटाला गोल करत ब्रिटनला पराभवाच्या छायेत लोटले.
भारतीय संघाने १९७२ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. जर्मनीच्या म्युनिचमध्ये पाकिस्तानविरोधात ही लढत झाली होती. परंतु भारताने हा सामना ०-२ ने गमावला होता. १९८० मध्ये सेमीफायनल खेळविली गेली नव्हती. राऊंड रॉबिन लीगनुसार पहिल्या दोन संघांमध्ये सुवर्ण पदकांसाठी आणि तिसऱ्या आणि चौथ्या संघामध्ये कास्य पदकासाठी सामने खेळविण्यात आले होते. मॉस्कोमध्ये झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या सहाच संघांनी भाग घेतला होता.