हॉकी संघाचे जोरदार पुनरागमन, स्पेनवरील विजयासह उपांत्यपूर्व फेरीचे आव्हान कायम
टोक्यो : ऑस्ट्रेलियाकडून स्वीकाराव्या लागलेल्या दारुण पराभवातून सावरत भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. आज स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाने ३-० असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. भारताकडून रुपिंदरपाल सिंगने दोन आणि सिमरनजीत सिंगने एक गोल केला. आता भारताचा पुढील सामना हा बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाला विजयी सुरुवात केली होती. पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला १-७ अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, आज झालेल्या लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. भारतीय खेळाडूंनी पहिल्या क्वार्टरमधील अखेरच्या क्षणी स्पेनवर दबाव वाढवला. १४ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली तर १५ व्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंगने गोल करून भारताची आघाडी २-० अशी वाढवली. सामन्यातील दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे मध्यांतराला भारताकडे २-० अशी आघाडी कायम राहिली.
त्यानंतर सामन्यातील तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे भारताची आघाडी कायम राहील. यादरम्यान, स्पेनला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्यांना त्यावर गोल करता आला नाही.
चौथ्या क्वार्टरमध्ये पहिल्या पाच मिनिटांत दोन्ही संघ आक्रमक खेळले. मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अखेर ५१ व्या मिनिटाला रूपिंदरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. या लढतीत भारताला ४ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यावर एक गोल करण्यात भारताला यश आले. तर स्पेनला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यांना एकही गोल करता आवा नाही. भारताकडून गोलरक्षक श्रीजेशने उत्तम खेळ केला. या विजयासह भारतीय संघ गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.