
कानपूर : ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला आहे. आज शेवटच्या आणि निर्णायक दिवशी उभय संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अवघ्या एका विकेटमुळे भारताच्या हातचा घास हिरावला गेला. भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजवले. राचिन रविंद्रनं ९१ चेंडू म्हणजे जवळपास १५ षटकं खेळून काढताना किवींचा पराभव टाळला अन् टीम इंडियाला अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. राचिन व अजाझ पटेल या शेवटच्या जोडीने ५२ चेंडू खेळून काढताना टीम इंडियाला शेवटची विकेट घेऊ दिली नाही. न्यूझीलंडने दिवसअखेर ९ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला.
पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं मिळालेल्या संधीचं सोनं करताना पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल यानं पहिल्या डावात किवींना दणका दिला, वृद्धीमान सहा वेदनेसह खेळला अन् अर्धशतक झळकावून संघाच्या खात्यात महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. आर अश्विन यानं अष्टपैलू कामगिरी केली. रवींद्र जडेजानं दुसऱ्या डावात सामन्याला कलाटणी दिली. पण, भारताला विजय मिळवता आला नाही.
भारतीय खेळाडूंनी चौथा दिवस गाजवला. ५ बाद ५१ धावांवरून टीम इंडियानं ७ बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं डीआरएस घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. लॅथम व विलियम सोमरविले यांनी पाचव्या दिवसाचे पहिले सत्र संयमानं खेळून काढताना अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिले सत्र सहजतेनं खेळून काढलं. नाइट वॉचमन सोमरविले यानं १०० हून अधिक चेंडूंचा सामना केला.
लंच ब्रेकनंतर पहिल्याच चेंडूवर उमेस यादवच्या बाऊन्सरवर सोमरविलेनं टोलावलेला चेंडू शुबमन गिलनं सुरेखरित्या टिपला. सोमरविले ११० चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. कर्णधार केन विलियम्सन व लॅथम यांनीही ११६ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. आर अश्विनच्या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची किनार घेत यष्टिंवर आदळली अन् लॅथमला माघारी जावं लागलं. त्यानं १४६ चेंडूंत ३ चौकारांसह ५२ धावा केल्या. अश्विननं या विकेटसह भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. अनिल कुंबळे ( ६१९), कपिल देव ( ४३४), अश्विन ( ४१८*), हरभजन सिंग ( ४१७) व इशांत शर्मा ( ३११) ही अशी क्रमवारी आहे. भारताकडून या डावात रवींद्र जाडेजाने ४, रवीचंद्रन अश्विनने ३, अक्षर पटेलने १ आणि उमेश यादवने १ विकेट घेतली.
अश्विनने घेतली भन्नाट विकेट
https://twitter.com/RISHItweets123/status/1465257503193632773
याआधी क्रिकेटमध्ये आपण काही भन्नाट विकेट पाहिल्या असतील मात्र रविचंद्रन अश्विनने घेतलेली ही विकेट जरा हटके आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजानं अश्विनच्या चेंडूचा यशस्वीरित्या डिफेन्स केला. मात्र तरीही तो क्लीन बोल्ड झाल्याचा भन्नाट प्रकार घडून आलाय. कानपूर टेस्टच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खराब विकेटवर जोरदार डिफेन्स केला, मात्र न्यूझीलंडचा विकेटकिपर, बॅट्समन टॉम ब्लंडेलच्या अशा प्रकारे आऊट होण्याने सर्वांनाच चकीत करुन सोडलं.
पाचव्या दिवशी कानपूरच्या कठिण पिचवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चागली फलंदाजी केली. काही फलंदाज खराब शॉट खेळून आऊट जरूर झाले, मात्र न्यूझलंडचा विकेटकिपर, बॅट्समन टॉम ब्लंडेल चागल्या प्रकारे डिफेन्स करत, सावध बॅटिंग करत होता. मात्र भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने त्याला अशा प्रकारे आऊट केले की तोही चकित झाला. मॅचच्या 79 व्या ओव्हरमध्ये अश्विन बॉलिंग करत होता त्याने बॉल टाकल्यानंतर बॅट्समनने चांगल्या प्रकारे डिफेन्स केला. त्यानंतर बॉलचा टप्पा जमिनीवर पडला आणि पायच्या मागून जाऊन बॉल सरळ विकेटमध्ये घुसला आणि विकेट उडवली. हा प्रकार पाहून कॉमेंटरी करणाऱ्यांपासून खेळाडू सर्वच चकित झाले.