ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हल मोदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकला आहे. सध्या सुरु असलेला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला.
लोकेश राहुल (१७) व रोहित शर्मा (११) हे झटपट माघारी परतल्यानंतर सर्व भार मधल्या फळीवर आला. पण, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनं गुडघ्यातून रक्त येत असूनही केवळ विराट कोहलीला बाद करण्यासाठी गोलंदाजी करत होता. त्याचे हे समर्पण सहकाऱ्यांनी वाया जाऊ दिले नाही. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेला रवींद्र जडेजाही अपयशी ठरला. विराट एकटा खिंड लढवत होता. त्यानं ८ चौकारांसह ५० धावा केल्या.
आधी कर्णधार विराट कोहलीचं (५०) अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने (५७) जोरदार फटकेबाजी करत ठोकलेलं अर्धशतक, याच्या जोरावर भारतीय संघाने कशीबशी १९१ धावांपर्यंत मजल मारली. विराट-शार्दुलव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. त्याउलट इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. इंग्लंडकडून या डावात ख्रिस वोक्सने ४, ऑली रॉबिन्सनने ३, जेम्स अँडरसनने १ आणि क्रेग ओव्हरटनने एक विकेट घेतली.
त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातदेखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत भारताची स्थिती मजबूत केली. प्रत्युत्तरात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर फलकावर ६ धावा असताना जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर माघारी परतले. रोरी बर्न्स (५) व हसीब हमीद (०) यांना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही. फॉर्मात असलेल्या जो रूट व डेवीड मलान या जोडीनं इंग्लंडला सावरले. या मालिकेत ५०० हून अधिक धावा करणारा रूट पुन्हा एकदा टीम इंडियासमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. २५ चेंडूंत २१ धावा करणाऱ्या रूटची एकाग्रता मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं भंग केली. उमेशच्या अप्रतिम इनस्वींग चेंडूनं रूटचा त्रिफळा उडवला. तोपर्यंत इंग्लंडने १७ षटकात ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्याप या डावात १३८ धावांनी आघाडीवर आहे.
शार्दुल ठाकूरची फटकेबाजी, ३१ चेंडूत अर्धशतक
टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकलेली असताना, लॉर्ड शार्दुल ठाकूर मात्र त्यांच्या गोलंदाजांना भिडला. नुसता भिडला नाही तर त्याने अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला १९१ धावांपर्यंत मजल मारता आली.
शार्दुलने या डावात ३६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा चोपल्या.
मालिकेत आघाडीसाठी दोन्ही संघ सज्ज
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली. पण ही आघाडी कायम ठेवण्यात तिसऱ्या कसोटीत भारताला यश आलं नाही. तिसरी कसोटी भारताने १ डाव ७६ धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता १-१ अशा बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडीसाछी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.