भारताची पाच शतके, तरीही गचाळ क्षेत्ररक्षणामुळे पहिल्या कसोटीत पराभव
बेन डकेट हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार
हेडिंग्ले : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्सने पराभव झाला आहे. यामुळे, संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने मागे आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. बेन डकेट हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डकेटने शतकी खेळी केली. तर इतर फलंदाजांनी चांगली साथ देत इंग्लंडच्या विजयात योगदान दिले.
लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी इंग्लंडला ३५० धावा करायच्या होत्या, ज्या संघाने ५ गडी गमावून साध्य केल्या. बेन डकेटने १४९ आणि जॅक क्रॉलीने ६५ धावा केल्या. बेन स्टोक्सने ३३ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताने इंग्लिश संघाला ३७१ धावांचे लक्ष्य दिले होते. पहिल्या डावात इंग्लंड ४६५ आणि भारत ४७१ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात भारताला ६ धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात भारतीय संघाने ९ झेल सोडले. संघाने पहिल्या डावात ६ आणि दुस-या डावात ३ झेल सोडले.
भारतीय खेळाडूंच्या ५ शतकांवर पाणी
भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतके केली. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ५०० धावाही करता आल्या नाहीत. भारताचा पहिला ४७१ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरात ४६५ धाव केल्या. त्यामुळे भारताला नाममात्र ६ धावांची आघाडी मिळाली.
भारताकडून दुसऱ्या डावात केएल राहुल याने शतक केले. तर ऋषभने पुन्हा शतक केले. ऋषभने यासह एकाच सामन्यात दुसरे शतक ठोकले. भारताने यासह एकाच सामन्यात ५ शतके झळकावली. मात्र दुसऱ्या डावातही भारताच्या इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यामुळे भारत दुसऱ्या डावात केवळ ३६४ धावाच करू शकला.
खालच्या फळीतील फलंदाज अपयशी : शुभमन गिल
एक शानदार सामना राहिला.आमच्याकडे संधी होती. आम्ही झेल सोडले, खालील क्रमातील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. मात्र मला माझ्या संघावर गर्व आहे. एकूणच चांगला प्रयत्न केला. आम्ही ४३० च्या आसपास धावा करुन डाव घोषित करु असा, आम्ही विचार करत होतो. मात्र दुर्देवाने आम्ही तसे करु शकलो नाहीत. त्यामुळे कायम त्रास होतो. यावेळेस आम्ही धावा करु शकलो नाहीत. आगामी सामन्यांमध्ये आम्ही यात सुधारणा करु, असा विश्वास शुभमनने सामन्यानंतर व्यक्त केला.
भारतीय संघाच्या पराभवाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे गचाळ क्षेत्रत्ररक्षण. भारताने या सामन्यात ९ झेल सोडले. यावरही शुभमनने प्रतिक्रिया दिली. “शाप्रकारच्या खेळपट्टीवर विकेट सहजासहजी मिळत नाहीत. मात्र आमची युवा टीम आहे. ते यातून शिकतील. आशा आहे की आम्ही सुधारणा करु. आम्ही पहिल्या सत्रात चांगली बॉलिंग केली. सहजासहजी धावा दिल्या नाहीत. मात्र चेंडू जेव्हा जुना होतो तेव्हा धावा रोखणे अवघड होते. जेव्हा चेंडू मऊ होतो तेव्हा विकेट घेणे गरजेचे असते, असे शुभमन गिल याने सांगितले.
अंतिम फेरीचे स्वप्न भंगण्याची शक्यता
इंग्लंडने ‘होम ग्राउंड’चा पूर्णपणे फायदा घेत भारताला चीतपट केले. भारताला खरे तर या सामन्यात विजयाची संधी चालून आली होती. पण हातात असलेले झेल सोडल्याने धावांचा फटका बसला. जीवदान मिळाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी बरोबर डाव साधला. एकट्या यशस्वी जयस्वालने ४ झेल सोडले. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७ स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने ही मालिका मोठ्या फरकाने गमावली तर अंतिम फेरीचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यानंतर विजयी टक्केवारी राखणे खूपच कठीण जाणार आहे.
इंग्लंडने भारताला पराभूत केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडचे १२ गुण झाले असून विजयी टक्केवारी १०० आहे. त्यात भारताच्या पारड्यात पराभव पडल्याने विजयी टक्केवारी शून्य ठरली आहे. त्यामुळे भारतीय संघाची क्रमवारीत श्रीलंका आणि बांगलादेशखाली घसरण झाली आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना ‘ड्रॉ’ झाला होता. त्यामुळे त्या दोन्ही संघांना प्रत्येकी ४ गुण मिळाले आणि विजयी टक्केवारी ३३.३३ टक्के आहे.





