Top Newsस्पोर्ट्स

भारताचा ५० वर्षानंतर ‘ओव्हल’वर ऐतिहासिक विजय; इंग्लंडवर १५७ धावांनी मात

रोहितचे शतक, शार्दुलची अष्टपैलू कामगिरी; मालिकेत २-१ आघाडी

लंडन : ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा १५७ धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावांपर्यंत मजल मारत ९९ धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला ३६८368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ २१० धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर १५७ धावांनी मात करत मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.

भारतीय संघानं ओव्हल मैदानावर ५० वर्षानंतर विजय संपादन केला. शेवटचा सामना १० सप्टेंबरला मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने ३५ वर्षानंतर इंग्लंडमध्ये एक मालिकेत २ सामने जिंकले आहेत. भारताकडून जसप्रीत बुरराह, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने कमालीची गोंलदाजी केली आणि भारताला दुसरा कसोटी विजय मिळवून दिला.

पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह या जोडीनं ६ धावांत इंग्लंडचे चार फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे एकवेळ २ बाद १४१ अशा सुस्थितित असलेला इंग्लंडचा डाव ६ बाद १४७ असा गडगडला. हा सामना ड्रॉ करण्याचा इंग्लंडचा मानस भारतीय गोलंदाजांनी डळमळीत केला. तळाच्या चार फलंदाजांना सोबत घेऊन ५४ षटकं खेळून काढणं हे अवघडच होतं, तरीही कर्णधार जो रूटनं १३ षटकं खेळली. पण, शार्दूल ठाकूरनं त्याचा त्रिफळा उडवून टीम इंडियाचा विजय पक्का केला. शार्दूलनं दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली शिवाय गोलंदाजीतही योगदान दिले. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात एकापेक्षा अधिक कसोटी जिंकणारा विराट कोहली हा आशियातील पहिला कर्णधार ठरला.

भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. रोरी बर्न्स १२५ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावा करून माघारी परतला. त्यानंतर डेवीड मलानसाठी डीआरएस घेतला गेला, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही आणि पुढील षटकात तो माघारी परतला. लंच ब्रेकनंतर सर्व काही बदलले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडला चार मोठे धक्के दिले.

हमीद ५५ धावांवर असताना रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजनं त्याचा सोपा झेल सोडला. मात्र, लंच ब्रेकनंतर जडेजानं अप्रतिम चेंडूवर हमीदचा त्रिफळा उडवला. हमीद १९३ चेंडूंत ६३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जसप्रीतनं कमाल केली. त्यानं ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांना झटपट माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहनं कसोटीत १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. त्यानं २४ डावांमध्ये १०० विकेट्स घेत कपिल देव यांचा ( २५ डाव) विक्रम मोडला. विजय आणि टीम इंडिया यांच्या मार्गात इंग्लंडचा कर्णधार जो रूट हा उभा होता. पण, तोही दुर्देवीरित्या बाद झाला. शार्दूलनं टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेनं मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू बॅटला लागून यष्टिंवर आदळला. रूट ( ३६) बाद झाल्यानं इंग्लंडसमोरील अडचणी आणखी वाढल्या.

रूट बाद झाला तेव्हा पाचव्या दिवसाची ४० षटकं फेकली जाणं बाकी होतं अन् इंग्लंडची ७ बाद १८२ अशी दयनीय अवस्था झाली होती. उमेश यादवनं भारताच्या मार्गातील अखेरचा अडथळा ख्रिस वोक्स ( १८) याला बाद केले आणि आता फक्त शेपूट उरले होते. उमेशनं आणखी एक विकेट घेत क्रेग ओव्हर्टनला ( १०) माघारी पाठवले. अखेरची विकेटही त्यानंच घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांवर गडगडला अन् टीम इंडियानं १५७ धावांनी बाजी मारून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. १९७१नंतर ओव्हलवर भारताचा हा पहिलाच विजय ठरला.

रोहित शर्माची तुफानी खेळी

चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. ६४ व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले. रोहित नोव्हेंबर २०१३ मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (२०२१) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

लॉर्ड शार्दुलची अष्टपैलू कामगिरी

इंग्लंडविरुद्ध सुरू ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या टॉपच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर गोलंदाज शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला. पहिल्या डावात शार्दूलने मैदानावर तळ ठोकून टिच्चून फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. शार्दूलने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार ठोकत दमदार ५७ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने कशीबशी १९१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही भारताचा डाव ३५० धावांमध्ये संपुष्टात होईल असे वाटत असताना पुन्हा एकदा शार्दुल टीम इंडियासाठी धावून आला. दुसऱ्या डावात त्याने ७२ चेंडूत ६० धावांची खेळी करत भारताला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला.

भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात १२७ षटकात ३६८ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खूपच आश्वासक होती. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं होतं. सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी सलामीसाठी शतकी (१००) भागीदारी केली. परंतु लार्ड शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बर्न्सचा ५० धावांवर असताना काटा काढला. त्यानंतर काही वेळाने जाडेजाने हमीदला त्रिफळाचित केलं. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं आहे. प्रत्येक फलंदाज ठराविक अंतराने बाद होते गेले. रुट मात्र या डावातही खेळपट्टीला चिकटला होता. मात्र पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुलने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने रुटला त्रिफळाचित करत भारताचा विजय पक्का केला.

इंग्लंडच्या कर्णधाराला होता विजयाचा विश्वास, पण…!

हसीब हमीद व रोरी बर्न्स यांनी शतकी सलामी दिल्यानंतर हा सामना सहज जिंकू, असे इंग्लंडचा कर्णधार जो रूट यालाही वाटलं होतं. पण, होत्याचं नव्हतं झालं अन् यजमानांना सामना गमवावा लागला. जो रूटनं या सामन्यातील खरा टर्निंग पॉईंट सांगितला. ”आम्हाला विजयाची संधी होती, परंतु टीम इंडियाला श्रेय द्यायला हवं. या सामन्यातून काहीच हाती न लागल्यानं निराश झालो आहे. चेंडू रिव्हर्स होऊ लागला आणि तेथेच भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली. पहिल्या डावात आणखी जास्तीच्या धावांची आघाडी घेता आली असती, तर निकाल काही वेगळा लागू शकला असता,”असेही रूट म्हणाला.

तो म्हणाला, ”जसप्रीत बुमराह हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पाचव्या दिवशी लंच ब्रेकनंतर त्याच्या स्पेलनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या त्या स्पेलनं सामनाच फिरवला.” जसप्रीत बुमराहनं या लंच ब्रेकनंतर ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांचा त्रिफळा उडवून कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले. भारताकडून सर्वात कमी २४ डावांमध्ये १०० कसोटी विकेट्स घेणारा तो जलदगती गोलंदाज ठरला. त्यानं कपिल देव यांचा २५ डावांत १०० विकेट्सचा विक्रम मोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button