राजकारण

इस्रायलमध्ये सत्तांतर; नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान

जेरुसलेम : सलग १२ वर्षे इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेले बेंजामिन नेतान्याहू यांना अखेर सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. इस्रायलच्या संसदेने यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला कौल दिला.

उजवे, डावे व मध्यममार्गी पक्ष, तसेच एक अरब पक्ष अशा वैचारिकदृष्टय़ा भिन्न राजकीय पक्षांची अभूतपूर्व आघाडी असलेल्या या नव्या सरकारकडे निसटते बहुमत आहे. ६० विरुद्ध ५९ अशा केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळवला. बेनेट यांनी रविवारी क्नेसेटमध्ये (इस्रायली संसद) त्यांच्या नव्या सरकारमधील मंत्र्यांचा परिचय करून दिला. नेतान्याहू यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले. विरोधी पक्षांच्या सदस्यांचा अखंड गोंधळ सुरू असतानाच, बेनेट यांनी भाषणात नव्या आघाडीच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. निरनिराळ्या मतांच्या नेत्यांसोबत आपण ही आघाडी तयार केली असून, या आघाडीबाबत आपल्याला अभिमान आहे. या निर्णायक क्षणी आम्ही जबाबदारी घेतली आहे. या देशाला आणखी विभाजित होऊ द्यायचे नाही, यासाठी असा निर्णय घ्यावा लागला, असे बेनेट म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button