स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपुरात बेमुदत ठिय्या आंदोलन

नागपूर : मागील अनेक वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे, पण सत्तेत आल्यानंतर राजकीय पक्ष या मागणीकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आता निकराची लढाई लढण्यास आम्ही सज्ज झालो असून एकतर विदर्भाचे स्वतंत्र राज्य द्या अन्यथा चालते व्हा असा इशारा आज विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते राम नेवले आणि माजी आमदार वामनराव चटप यांनी दिला.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य द्या, कोरोना काळातील वीजबिलांपासून विदर्भातील जनतेला मुक्त करा आणि पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढ कमी करा या तीन मागण्यांसाठी आज ऑगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विदर्भ चंडिका मंदिर शहीद चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाच्या प्रारंभी उपस्थित विदर्भप्रेमींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडीप्रमुख मुकेश मासुरकर, जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांच्यासह विदर्भाच्या विविध प्रांतामधून आलेले नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राम नेवले यांनी, केंद्रस्थानी विविध राजकीय पक्षांची सरकारे आली, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सर्व पक्ष अनुकूल असल्याचे सांगण्यात येते, पण तेच पक्ष सत्तेत आल्यानंतर मात्र सोयीस्करपणे या मागणीकडे दुर्लक्ष करतात, हा आमचा आजवरचा अनुभव आहे. भाजपाने देखील पक्षाच्या भुवनेश्वर येथील अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचा ठराव पारित केला, पण मागील सत्ताकाळात तसेच आजतागायत कुणीही या मागणीचा साधा उल्लेख केलेला नाही. आता यासंदर्भात आरपारची लढाई लढणार आहोत, त्यासाठी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता हे ठिय्या आंदोलन नेटाने राबविण्यात येईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाल्यास आर्थिक समृद्धी, रोजगार, उद्योग, खनिज संपत्ती आदी बाबी विदर्भाकडे मुबलक प्रमाणात आहेत, त्याचा लाभ आगामी पिढ्यांना मिळेल. विदर्भात वीज, पाणी, खनिज आणि वनसंपदा अधिक आहे, विदर्भ हे स्वतंत्र राज्य झाल्यास त्याचा लाभ वैदर्भीयांना मिळणार आहे. असेही यावेळी वामनराव चटप यांनी सांगितले.आंदोलन सुरू होण्याच्या निर्धारित वेळी सर्व कार्यकर्ते आणि नेते विदर्भ चंडिका मंदिर परिसरात एकत्र झाले, विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ सर्वांनी घोषणा दिल्या. त्यानंतर उपस्थितांनी विदर्भ चंडिकेच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली, महाआरती करण्यात आली व राज्यकत्र्यांना सुबुद्धि दे असे साकडे घातले आणि ठिय्या आंदोलनाला प्रारंभ झाला. या आंदोलनात सुनील वडस्कर, सुयोग निलदावार, रेखा निमजे, सुनीता येरणे, तात्यासाहेब मते, प्रशांत जयकुमार, वृषभ वानखेडे, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, अण्णाजी राजेधर, उषा लांबट, शैलेश धर्माधिकारी यांच्यासह शेकडो विदर्भप्रेमींचा सहभाग आहे




