मथुरा: केंद्रातील मोदी सरकारवर अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोघांनाही अर्थशास्त्र कळत नसल्याची टीका स्वामी यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका कार्यक्रमात बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला हा घरचा आहेर दिला आहे. देशभरात वाढत चाललेल्या महागाईसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जबाबदार ठरवत, अर्थमंत्री सीतारामन या कोणाचाही सल्ला घेत नाहीत. केंद्रातील मोदी सरकारला अर्थशास्त्र कळत नाही. याची माहिती ना पंतप्रधानांना आहे, ना अर्थमंत्र्यांना, असा दावा स्वामी यांनी केला आहे.
देशातील वाढती महागाई तसेच अन्य मुद्द्यांबाबत सरकार कुणाचाही सल्ला घेत नाही, अशी खंत व्यक्त करत, विकासदर घसरला, तर काय करायचे हे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना माहिती नाही. आता ज्या ठिकाणी मशिदी आहेत, त्या ठिकाणी हिंदू प्रार्थनास्थळे असायची, असा दावा काही हिंदुत्ववादी गटांनी केला आहे. प्रार्थना स्थळे (विशेष तरतुदी) कायदा १९९१ रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या दाव्याला केंद्र सरकारने अजूनही प्रतिसाद दिलेला नाही, असेही स्वामी यांनी सांगितले.
दरम्यान, चीनसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावरही केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसल्याचेही खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी अस्तित्वात आलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचे अन्य कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात रूपांतर करता येणार नाही, असे प्रार्थना स्थळे (विशेष तरतुदी) कायदा १९९१ या कायद्यात म्हटले आहे. यापूर्वीही अनेक मुद्द्यांवरून सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कृषी कायदे रद्द केल्यानंतरही चीनचा मुद्दा उपस्थित करत स्वामी यांनी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.