उत्तर प्रदेशात ७५ पैकी ६७ जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष
समाजवादी पक्षाला केवळ ५ जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर समाधान
लखनौ : उत्तर विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जात असलेल्या राज्यातील पंचायत निवडणुकीतील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. ७५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांपैकी ६७ ठिकाणी भाजपाने बाजी मारली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला पाच जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. तर रालोदला एक, तर अन्य दोन ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचे श्रेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला दिले आहे, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या विजयावर ‘एसपी साफ, बीजेपी टॉप’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एप्रिल मे महिन्यामध्ये झालेल्या उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आज जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांमधून ५३ जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मतदान झाले. यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. तर याआधी बिनविरोध निवडल्या गेलेल्या २२ पैकी २१ जिल्हा परिषद अध्यक्षपदांवरही भाजपाने कब्जा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे मुलायम सिंह यादव यांचा वरचष्मा असलेल्या मैनपुरी आणि सोनिया गांधींचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्येही भाजपा उमेदवाराने विजय मिळवला.
शनिवारी झालेल्या ५३ जिल्ह्यांतील मतदानामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. केवळ एटा, संतकबीरनगर, आझमगड, बलिया, बागपत, जौनपूर आणि प्रतापगड जिल्ह्यात भाजपाचा पराभव झाला, तर अन्य ४४ ठिकाणी भाजपाने बाजी मारली. राज्यातील ७५ जिल्ह्यांपैकी भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशातील १४ पैकी १३, बृज क्षेत्रातील १२ पैकी ११, कानपूर क्षेत्रातील १४ पैकी १३, अवध क्षेत्रातील १३ पैकी १३, काशी क्षेत्रातील १२ पैकी १० आणि गोरखपूर क्षेत्रातील १० पैकी ७ ठिकाणी विजय मिळवला.
भाजपाने समाजवादी पार्टीचे गड समजल्या जाणाऱ्या मैनपुरी, रामपूर, बदायूं आणि आझमगडसह काँग्रेसच्या राजबरेली या बालेकिल्ल्यातही विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाला अपक्ष उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यासह भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल (एस) पक्षालाही दोन पैकी एका जागेवर विजय मिळाला.