![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/08/sameer-wankhede.jpg)
मुंबई : क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
क्रुझवरील धाडीत पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते. आर्यन खानला सोडण्यासाठी ही डिलिंग होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने या आरोपाची गंभीर दखल घेतली आहे.
एनसीबी अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीची अजून चौकशी होणार आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. दक्षिणी आणि पश्चिमी क्षेत्रातून काही माहिती मिळाली आहे. त्यावरून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, समीर वानखेडे आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. संध्याकाळपर्यंत ते दिल्ली पोहोचणार असून दिल्लीत गेल्यावर त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. खंडणीच्या अँगलनेच वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.