१८ वर्षांपुढील लसीकरणाला तूर्त ब्रेक, वृद्धांना प्राधान्य : राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी लसी या ४५ वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. राज्यात अॅक्टिव्ह केस कमी होत आहेत. बरे होण्याच्या दर वाढत आहे. २ लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. १ कोटी ८४ लाख लसीकरण झाले आहे. आता ३५ हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहेत. राज्य शासनाने खरेदी केलेली ३ लाख कोव्हॅक्सिन ४५ वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहे, त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस ४५ पुढील वयोगटांना दिले जाणार आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
वय १८ ते ४४ या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लसीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लसीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून १८ ते ४४ या वयोगटातील लसीचा साठा हा ४५ वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असंही टोपे यांनी स्पष्ट केले.
रेमडेसिवीर इंजेक्शन ग्लोबल टेंडर काढले जाणार आहे. ६ कंपन्या यासाठी इच्छुकता दाखवली आहे. साधरण प्रत्येक कंपनी किमान ५० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देईल, असंही टोपेंनी सांगितले. व्हॅक्सिनबाबत ग्लोबल टेंडर काढणे कठीण आहे. कारण त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी गरजेची आहे. केंद्र सरकरला विनंती केली आहे की व्हॅक्सिनसाठी परवानगी द्यावी लागेल, असंही टोपेंनी सांगितले.