राजकारण

तोल ढासळलेल्यांवर टीका नाही तर, उपचार करायचे असतात; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांतदादांवर निशाणा साधला. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्र राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली, ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचं काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात, असा सवालही त्यांनी केला.

फडणवीस मातोश्रीवरही येतील !

फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्यांचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असंही टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button