रेमडेसिवीर न मिळाल्यास कोरोनाबाधितांसह मातोश्रीवर ठाण मांडणार : सदाभाऊ खोत
सातारा : दोन दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांना मिळाले नाही तर कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर ठाण मांडणार असल्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. खोत म्हणाले की, महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे कोरोनाचा मृत्यू दर वाढत आहे. या मृत्यूला जबाबदार ठाकरे सरकार आहे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, इतर राज्यांनी रेमडेसिवीरचा साठा केला आहे. ठाकरे सरकारने फक्त दुसऱ्या लाटेचा धिंडोरा पिटला आहे. डीपीसीटीतला पैसा आपल्या पक्षातले आमदार, आपले कार्यकर्ते पालकमंत्री यांनी आपापल्या मतदार संघात वाटून खाल्ला. ग्रामीण विकास अंतर्गत 20–20 कोटीचा फंड राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांना दिला. हेच पैसे लोक वाचवण्यासाठी करायला पाहिजेत होते, असा आरोप सदाभाऊ खोतांनी केला.
खोत म्हणाले की, रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध आहे. औषध खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारने भूमिका घेतली की आम्हीच खरेदी करणार. हे इंजेक्शन एखाद्या कंपनीने प्रायवेट मेडिकलला दिली तर त्याला दम दिला. या कंपनीला साडे सहाशे रुपयाला इंजेक्शन मागत होते आणि दुकानदार बाराशे रुपयांने खरेदी करायला तयार होते. मात्र त्यांना खरेदी करुन दिली नाहीत. याचे कारण औषध निर्माण मंत्र्याला यातून खंडणी गोळा करायची होती. राज्य सरकारचं कमिशन आणि औषध निर्माण मंत्र्यांचे कमीशन न ठरल्यामुळे, खंडणी न मिळाल्यामुळे हे इंजेक्शन मिळत नाही, असा आरोपही त्यांनी केला.