Top Newsराजकारण

अधिवेशनात भाजप नेत्यांची मीच पोलखोल करणार; नवाब मलिकांचा हल्लाबोल सुरूच

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या हे दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. त्यांची धमकी पोकळ आहे. मीच अधिवेशनात भाजप नेत्यांची पोलखोल करणार आहे. त्यावेळी भाजप नेते तोंड लपवून फिरतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भांडाफोड करणार आहे की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल, असा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच पिक्चर सुरू आहे. इंटरव्हल झाला आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जातीसंबंधी कागदपत्र दिल्याची माहिती अरुण हलदर यांनी दिली आणि म्हटले की, ‘वानखेडेंचे जातीसंबंधीची कागदपत्र तपासून त्यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते नाही. असे वैयक्तिक आरोप करणे योग्य नाही आहे.’ या अनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिमच आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद आहे.’

वानखेडे यांनी खोटेपणाने बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. एका मागासवर्गीयाचा हक्क वानखेडेंनी हिरावून घेतला आहे. समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची योग्य पडताळणी व्हायला व्हावी. यांसदर्भात मी सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार आहे. हलदर यांनी संवैधानिक पदाचा मान ठेवून वागावं. थेट माध्यमांसोबत बोलणं म्हणजे ‘डाल मैं कुछ काला है.’

आठवलेंना टोला

तुमच्याकडे इतका मोठा पसारा आहे. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय आहे. सर्व काही आहे. तुम्ही सात वर्ष नवाब मलिकांबाबत खोदत आहात. अजून खोदा. पण मी काही केलंच नाही. तुम्ही करणार काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे, असं ते म्हणाले.

समीर वानखेडे जन्मानेच मुस्लिम

मी काल ट्विट केलेला फोटो हा जसमीन वानखेडे यांच्या पतीचा आहे. समीर वानखेडेचा हा मेव्हणा आहे. सध्या युरोपमधील व्हेनिसमध्ये तो राहतो. जसमीन वानखेडे यांच्या सोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे. समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही कारण ते जन्मानेच मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे, असा दावाही त्यांनी केला. वानखेडे कुटुंबाने २०१५ पासून आपली ओळख लपवली. फेसबुकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असंही त्यांनी सांगितलं.

मी दिवाळीनंतर फटाक्यांवर फटाके फोडणार; किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

तुम्ही लवंगी फटका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे, असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरीट सोमय्या यांनी हा इशारा दिला. एक नाय… दोन नाय… तीन नाय… चार नाय… पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फुटणार आहेत. दिवाळी ते देव दिवाळीपर्यंत हे फटाके फुटणार आहेत. या ठाकरे सरकारने घोटाळे केले. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आहेत. अजित पवारांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयांना खूश केलं. नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खूश केले. पण मी या सर्वांचे फटाके फोडले, असं सोमय्या म्हणाले.

आम्ही अ‍ॅटम बॉम्ब फोडतो. त्यांनी लवंगी मिरची फोडली. तीही फूस्स गेली. गेली १३ दिवस नाटक सुरू आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घोटाळ्यापासून लक्ष विचलीत करायचं होतं. रोज उठून मलिक ट्विट करतात, फेसबुकवर पोस्ट टाकतात, नंतर पीसी घेतात. वानखेडे हिंदू नाही, मुस्लिम आहेत… मुस्लिम नाहीत, दलित आहेत… क्रांती रेडकरचा नवरा मुस्लिम आहे… त्याचं पहिलं लग्न झालं… हे झालं अन् ते झालं… गेल्या १३ दिवस हेच सुरू आहे. काय लावलं आहे महाराष्ट्रात? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

क्रांती रेडकरने घेतली रामदास आठवलेंची भेट

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिमच आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. त्याचबरोबर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरीचेही आरोप करण्यात आले आहेत. अशावेळी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे. क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे हे आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीसाठी बांद्र्यातील निवासस्थानी दाखल झाले.

त्यांची साथ आम्हाला हवी आहे. आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. आमच्या अडचणी त्यांना सांगू. त्यांनी यापूर्वीही आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी अपेक्षा आहे, असं क्रांती रेडकर म्हणाले. त्यावेळी नवाब मलिक यांनी रात्री यास्मिन वानखेडे यांच्याबद्दल ट्विट केलं आहे, त्याबाबत काय म्हणणं आहे? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना आम्हाला त्यांच्यासाठी वेळ नाही, असं उत्तर क्रांती रेडकरने दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button