मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मोफत लसीकरणाबाबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी सही झाली आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी महत्त्वाची माहिती दिली. छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांनी विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या पार पडणार आहे. या बैठकीत लसीकरणाबद्दल १ मे रोजी सरकारची काय भूमिका आहे यावर चर्चा केली जाणार आहे. यानंतर बैठकीत सर्वानुमते काय निर्णय घेण्यात आला याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील, असे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाबाबत उद्या निर्णयाची शक्यता असल्याचे देखील सांगितले. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाईल. राज्याच्या जनतेचा हिताचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे अजित पवार म्हणाले.
लसीची कमतरता केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे. याशिवाय, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. या सगळ्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. आम्ही रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की पूर्वी आम्हाला रेमडेसिवीर राज्य सरकारला थेट देता येत होते, आता केंद्र ठरवतं. सध्या देशात उत्पादन होत असलेल्या रेमडेसिवीर अपुरे आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजितदादांचा टोला!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचित आहे. अनेकदा जाहीरपणे देखील अजितदादा मनातलं थेट बोलून मोकळे होतात. काही वेळा त्यांना अशी वक्तव्य अंगलट देखील आलेली आहेत. मात्र, तरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामध्ये अजिबात फरक पडलेला नाही. माध्यम प्रतिनिधींसोबत अनेकदा अजित पवार अशाच प्रकारे कधी थेट तर कधी विनोदी शैलीमध्ये मनात आहे ते बोलत असल्याचा अनेकांना अनुभव आहे. मंगळवारी राज्यातील प्रस्तावित मोफत लसीकरणाविषयी बोलताना देखील अजित पवारांनी आपल्या वक्तव्यांचा कसा विपर्यास होऊ शकतो आणि त्याचसाठी कसा संयम ठेवायला हवा, हेच जणूकाही स्पष्ट केलं!
या मुद्द्यावरून जेव्हा अजित पवारांना विचारणा केली गेली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे, मोफत लसीकरणाविषयी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं सांगितलं. ज्या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक भार पडू शकतो, त्यावर निर्णय महाविकासआघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. बाकीच्यांनी त्यामध्ये समंजस भूमिका घ्यायला हवी. अशी वक्तव्य इतरांनी टाळलेलं चांगलं, असं म्हणत अजित पवारांनी मोफत लसीकरणाविषयी वक्तव्य करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे समजच दिल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोफत लसीकरणावर चर्चा होणार असून तेव्हाच निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा खोदून खोदून काय निर्णय होऊ शकतो, असं विचारलं असता अजित पवारांनी त्यावरून प्रतिनिधींना चांगलाच टोला हाणला. आत्ता मी काही बोललो आणि उद्या तिकडे मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्यांच्या चर्चेत काही वेगळा प्रस्ताव मंजूर झाला तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल. बघा अजित पवार हे म्हणाले होते आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा उद्या काय तो निर्णय होईल. २४ तास प्रतीक्षा करा, असं अजित पवार म्हणाले.