Uncategorized

मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही, प्रकृती उत्तम : अमोल मिटकरी

अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं वृत्त काल (सोमवार) समोर आलं होतं. त्यानंतर खुद्द अमोल मिटकरींनी आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही, माझी तब्येत ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मिटकरींनी केले आहे. हॉस्पिटलमधून ट्विटरवर फोटो शेअर करत अमोल मिटकरी यांनी प्रकृतीची माहिती दिली.

“काल सकाळपासून माझ्या तब्येतीविषयी सुरु असलेल्या बातम्यांवर चर्चा सुरु आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईन” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक आणि प्रख्यात गायिका वैशाली माडे यांचा रविवारी अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बी फार्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली” ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काही जणांना झाली. त्यामुळे तात्काळ मिटकरींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. परंतु मिटकरींना अर्धांगवायूचा झटका आल्याचं वृत्त पसरलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button