राजकारण

नवाब मलिक, वळसे-पाटलांना कधीच भेटलो नाही : सुनील पाटील

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेले सर्व आरोप सुनील पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ऋषिकेश देशमुखांना मी ओळखत नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कधीच भेटलो नाही, असं सुनील पाटील यांनी म्हटलं आहे.

सुनील पाटील आज पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मोहित कंबोज यांनी केलेले. आर्यन खान प्रकरणात मला फसवलं गेलं. मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. हवं तर सीसीटीव्ही फुटेज काढून तपासा, असं आव्हानच सुनील पाटील यांनी दिलं.

मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर १० तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच, ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध नाही. ऋषी देशमुख यांना मी ओळखत नाही. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं. बनावट रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, असं ते म्हणाले.

कंबोज यांनी त्यांच्यावर बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यालाही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. मी जर बदल्यांचं रॅकेट चालवतोय तर माझ्याकडे किमान १०० कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास करा आणि नंतर रॅकेटची वार्ता करा, असं आव्हानच त्यांनी कंबोज यांना दिलं.

मनिष भानुशालीने दिल्लीत बोलवून मारहाण केली

पाच-सहा दिवसांपूर्वी मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावून घेतलं होतं. दिल्लीत गेल्यावर या दोघांनीही मला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा धक्कादायक आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळच वळण लागलं आहे.

मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. अहमदाबादेत मी थांबलो होतो. पाच सहा दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशालीने मला दिल्लीला बोलावलं होतं. मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो होतो. दिल्लीत गेल्यावर पहिल्या दिवशी मला धमकी दिली. मारहाण केली. इथून गेला तर मारून टाकू, आम्ही मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत. तू यांना एक्सपोज कर, असं मला धमकावलं. त्यावर, काय एक्सपोज करू? जे सत्य आहे ते सांगा ना. मी कशाला कुणाला एक्सपोज करू, असं मी त्यांना सांगितलं, असं पाटील यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते, शराब, कबाब असं तिथे घडत होतं, असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोज यांना सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button