राजकारण

फडणवीसांनी आरोप सिद्ध करावेत; अनिल परब यांचे आव्हान

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIAच्या कोठडीत असलेले सचिन वाझेंवरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना सेवेत घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आपल्याशी बोलले होते. तसंच शिवसेनेचे काही मंत्री आपल्याला भेटल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

सचिन वाझेला घेण्यासाठी शिवसेनेने मागणी केली, या गोष्टी कपोलकल्पित आहेत. फडणवीस यांनी अॅडव्होकेट जनरल यांचं मत घेतल्याचं सांगितलं. त्यांनी कधी लेखी मागितले आणि अॅडव्होकेट जनरल यांनी कधी लेखी दिलं, हे फडणवीसांना दाखवावं, असं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे. तसंच कुणाचीही चौकशी करावी. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही काही घाबरुन कुठली चौकशी करु नये, अशी विनवणी करीत नाही. कुठलीही चौकशी करायला यंत्रणा मोकळी आहे. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असंही परब म्हणालेत.

बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. 2018 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. तेव्हा निलंबित असलेले वाझे यांना पोलीस दलात पुन्हा घ्यावं, असं ठाकरे म्हणाले होते. तसंच शिवसेनेचे काही मंत्रीही त्यासाठी आपल्याकडे आले होते, असं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

फडणवीस म्हणाले होते की, वसई-विरारमध्ये खंडणी मागणाऱ्यांचं जे रॅकेट सापडलं होतं. त्यात एपीआय सचिन वाझे यांचं नाव होतं. 2004 मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानं निलंबित करण्यात आलं होतं. 2007 मध्ये वाझे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता. पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा, निलंबनाची कारवाई होऊन चौकशी चालू असल्यामुळे व्हीआरएस नाकारण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button