नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज संधी मिळेल तेव्हा काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर करत आहेत. पटोलेंच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्षेपही घेतला आहे. स्वबळाच्या मुद्द्यावरून आघाडीकडून काँग्रेसला चिमटेही काढले जात आहेत. मात्र, असं असतानाही काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पटोलेंच्या या घोषणेवर थेट कानावर हातच ठेवले आहेत. पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही, असं आश्चर्यकारक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं अधोरेखित झालं आहे.
अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये होते. चव्हाण नांदेडमध्ये आल्याने पत्रकारांनी त्यांना गाठलं अन् थेट नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबतच प्रश्न केला. मात्र, त्यावरील चव्हाण यांचं अनपेक्षित उत्तर ऐकून पत्रकारही अवाक् झाले. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिलाय याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असं चव्हाण यांनी बिनदिक्तपणे सांगितलं. हा विषय आता संपला असून आमचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं वारंवार सांगितलं होतं. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा वगळता बहुतेक नेत्यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर भर दिला होता. पण पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवसापासूनच स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. निवडणुकांना अजून तीन वर्षे असतानाही पटोले यांनी स्वबळाची भूमिका रेटली आहे. पटोलेंचा हा निर्णय न पटल्याने त्यांच्या या भूमिकेवर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर स्वबळाचा मुद्दा पटोले यांनी अधिकच लावून धरला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोलेंचे कानही टोचले आहेत. आता तर चव्हाण यांनी पटोलेंच्या या निर्णयाची माहितीच नसल्याचं सांगून पटोलेंच्या निर्णयाला नाकारले आहे. तसेच अप्रत्यक्षपणे पटोलेंच्या कार्यशैलीवरही आक्षेप घेतला आहे. पटोले आपल्या निर्णयामागे संपूर्ण पक्षाला ओढून नेत असल्याची भावना निर्माण झाल्यानेच चव्हाण यांनी असं विधान केलं असावं, असं सूत्रांनी सांगितलं.