नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी भाजपने केलेल्या एका आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो, असं म्हटलं आहे. भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपने केलेल्या गंभीर आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे विधान केलं आहे.
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचं म्हटलं होतं, त्यावर उत्तर देत आमच्यात मतभेद कुठे आहेत? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. याच वेळी प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. संघर्ष योगीजींच्या डोक्यात सुरू आहे. भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यातील मतभेदांवरून योगी आदित्यनाथ असं बोलत आहे, अशी जोरदार टीका केली आहे.
मोदीजी, हेच का भाजपचे संस्कार?, राहुल गांधींवरील टीकेवर केसीआर संतापले
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात, पण आम्ही त्यांना कधीही राजीव गांधी यांचा मुलगा असल्याचा पुरावा मागितला नाही, असे वक्तव्य हिमंत बिस्वा शर्मा यांनी केले होते.
याच वाक्याचा संदर्भ देत के चंद्रशेखर राव यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदीजी ही भाजपची संस्कृती आहे का? ही आपल्या देशाची मर्यादा आहे का? शरमेने माझी मान झुकली आहे. तुमचे नेते एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल खालच्या पातळीची टीका करतात, त्यांना पुरावे मागतात. देशासाठी ही चांगली बाब नाही, असे म्हटले आहे.
वेद, भगवत गीता, रामायण, महाभारतातून हीच शिकवण मिळाली आहे का ? हिंदू धर्माला विकून मतदान मागणाऱ्यांनो, तुम्ही खूप खराब लोक आहात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना असामच्या मुख्यमंत्र्यांना राहुल गांधींवरील वक्तव्यामुळे पदावरून हटवण्याची मागणी करतो, अशी टीका केसीआर यांनी केली.
हिमंत बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य
२०१६ साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी त्या स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. त्यावरुनच हिमंता बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधींवर टीका केली. उत्तराखंडमधील एका निवडणूक रॅलीत बोलताना ते म्हणाले की, ‘बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा राहुल गांधींना हवा आहे. पण, आम्ही तुम्हाला राजीव गांधींचे पुत्र असल्याचा पुरावा मागितला का? लष्कराकडून पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमचा बिपिन रावत किंवा सैनिकांवर विश्वास नाही का? पाकिस्तानात घुसून हल्ला केल्याचे आमच्या सैनिकांनी सांगितले असेल तर ते अंतिम आहे, असे ते म्हणाले होते.
महाराष्ट्रात आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासलं
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातली युथ काँग्रेस सध्या चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई युथ काँग्रेसकडून गाढवावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आंदोलन करण्यात आले आहे.
काँग्रेसने फक्त आंदोलनच नााही केलं. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्या फोटोलाही काळे फासले आहे. मुंबई काँग्रेस कार्यालय या ठिकाणी मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन झाले आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आज आम्ही त्यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड काढली. यांच्या फोटोला काळं फासलं आणि राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या फोटोला चपला मारल्या, चपला घातल्या. हिमंत बिस्वा शर्मा यांचा भाजपने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी यावेळी झीशान सिद्दीक्की यांनी केली आहे.