Top Newsराजकारण

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मी उमेदवार नाही : शरद पवार

मुंबई : निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेट घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बातम्या चुकीचे असल्याचे शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं. मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काय येईल हे सर्वांनाच माहिती आहे. कारण, समोर ३०० पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचाही उमेदवार असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

प्रशांत किशोर मला दोनदा भेटले, पण आम्ही त्यांच्या एका कंपनीबद्दलच बोललो. २०२४ च्या निवडणुका किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नेतृत्वाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. प्रशांत किशोर यांनी मला सांगितले की त्यांनी निवडणुकीची रणनीती आखण्याचे काम सोडले आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका असोत की राज्य निवडणुका, त्या फार दूर आहेत, राजकीय परिस्थिती बदलतच आहे. २०२४ च्या निवडणुकीत मी कोणतेही नेतृत्व स्वीकारणार नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवारांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर या दोघांमध्ये दिल्लीतही दोन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी शरद पवार पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी करत आहेत का याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. काँग्रेससारख्या प्रमुख राष्ट्रीय पक्षाला अजून पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाहीय. अध्यक्षपदाचा प्रश्न इतका काळ भिजत ठेवल्यानंही काँग्रेसच्या सहकारी पक्षांमध्ये नाराजी असल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी असला तरी प्रमुख विरोधी पक्षांनी त्यासाठी तयारी सुरु केल्याचं दिसून येतंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button