राजकारण

शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल

कुडाळ : राज्यात कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाहीत. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा सवाल भाजपचे नेते नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच हा सवाल केला आहे. लोकसभेचं अधिवेशन हे १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत होणार आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे. हे राज्याचं अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे. महाराष्ट्रात जटील प्रश्न आहेत. गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. ते मात्र पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही. त्यामुळेच दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे. एका बाजुला स्वत:ला वाघ म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा, असा हल्लाबोल राणे यांनी केला.

स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. त्याला नोकरी मिळाली असती तर तो आज जिवंत असता. त्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. लोणकर याच्या मृत्यूनंतर हे सरकार आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत आहे, असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button