कोरोनाचे भयावह रुप! देशात २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण, २७६७ मृत्यू
नवी दिल्ली : देशातील कोरोना दिवसेंदिवस अधिक भीषण होऊ लागला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधित सापडले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.
देशात आजपर्यंत एकूण १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ कोरोनाबाधित सापडले आहेत. तर त्यापैकी १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या बाबतीत काहीसा दिलासा असला, तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी, जमावबंदी, करोना निर्बंध किंवा लॉकडाऊन असे पर्याय स्वीकारून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
देशात कोरोनाचा प्रसार वाढू लागलेला असताना रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक भागांमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांचे जीव गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आणि देशाच्या इतरही न्यायालयांमध्ये खटले देखील सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी केंद्र सरकारने पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.