Top Newsराजकारण

हिंदू जगातील सर्वांत सहिष्णू, सभ्य : जावेद अख्तर

मुंबई : गीतकार, कवी जावेद अख्तर यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका केली होती. यानंतर जावेद अख्तर यांना अनेक स्तरांवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर जावेद अख्तर यांनी सामनामध्ये लेख लिहून या प्रकरणी स्पष्टीकरण देत सविस्तर भाष्य केले आहे. जेव्हा ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे, असे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या टीकाकारांनी म्हटले आहे की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही. त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा आरोप केला आहे. मला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही की, गेल्या काही वर्षांत मी काय काय केले आहे याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. कारण मी काही इतकाही महत्त्वाचा माणूस नाही की मी काय करतोय किंवा काय करत होतो हे प्रत्येकाला माहिती असावे, असा टोला जावेद अख्तर यांनी लगावला.

गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पहिले, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हादेखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होताच, त्याशिवाय मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी (एमएसडी) नावाच्या संस्थेसह हैदराबाद, अलाहाबाद, कानपूर आणि अलिगढ यांसारख्या हिंदुस्थानातील अनेक शहरांचा दौरा केला होता. अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. त्यानंतर एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता. मौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहे, असे जावेद अख्तर म्हणाले.

काहींनी माझ्यावर तालिबानचे गौरवीकरण केल्याचा आरोप केला आहे. यापेक्षा तथ्यहीन आणि हास्यास्पद काहीही असू शकत नाही आणि माझ्या मनात अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल फक्त तिरस्कार आहे, असे सांगत हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हेदेखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत? याचे उत्तर असे आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे. प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला आहे, असे जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत बरेच साम्य, गोळवलकरांचा उल्लेख केल्याने नाराजी, धर्म, जात आणि पंथाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला विरोध अशा अनेकविध मुद्द्यांवर जावेद अख्तर यांनी परखडपणे भाष्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button