Top Newsराजकारण

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून हायकोर्टाची सरकारला फटकार !

मुंबई : राज्यात ऐन दिवाळीच्या सणात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. महामंडळातील कामगारांच्या विविध संघटनांनी एकजूट दाखवत संपाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे, राज्यातील बससेवा कोलमडली असून प्रवाशांचे, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे संपाचे हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून न्यायालयानेही सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात कर्मचारी संघटनांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वाची माहिती दिली.

एसटी महामंडळातले ९० टक्के कामगार आज कामावर हजर नाहीत. आत्तापर्यंत ३५ कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या कामगारांना न्यायाचं पहिलं पाऊल मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील शासन निर्णय करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ५ वाजेपर्यंत बैठक घेण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, सरकारकडून असं सांगण्यात आलं की, सरकारचे एक अधिकारी अमेरिकेत किंवा कुठल्या देशात आहेत, तिथे रात्र असू शकते. त्यावर, त्यांना उठवा आणि लोकांचा जीव गेलेल्या या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या, यााबतची बैठक झाली पाहिजे, असे आदेशच न्यायालयाने दिल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

ज्याप्रकारे आंध्र आणि तेलंगणात सरकारने कामगारांना सेवेत सामावून घेतले, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे सरकारने काम केले पाहिजे, असे आम्ही न्यायालयासमोर म्हणणे मांडले. तसेच, निर्णय होईपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार असल्याचेही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. दरम्यान, एका विभागातून दुसऱ्या विभागात ही प्रक्रिया 12 आठवड्यात संपावयची आहे, असे न्यायालयाने सांगितल्याचेही सदावर्ते म्हणाले.

पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत बैठका घेतात. पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही. आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर ३१ जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, अशा शब्दांत पडळकरांनी सरकारवर तोफ डागली.

पुण्यात एसटीला ‘ब्रेक’; स्वारगेट, शिवाजीनगरसह आणखी ३ डेपो बंद

एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी आता जोर पकडत आहे. रविवारी पुणे विभागांतील तीन डेपो बंद झाले. रविवारी मध्य रात्री 12 वाजल्यापासून काही डेपो बंद होऊन सोमवारी सकाळपासून पुण्यातील एसटीसेवा बंद झाली आहे. कर्मचारी संघटनांनी याची नोटीस देखील एसटी प्रशासनाला दिली आहे. तर दुसरीकडे कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने सोमवारी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत कोणताही निर्णय होईल याची वाट न बघता कर्मचारी सोमवार पासून संपावर ठाम आहे. त्यामुळे सोमवार पासून पुण्यात एसटीच्या चाकांना ब्रेक लागणार असून स्वारगेट शिवाजीनगर सहित आणखी तीन डेपो बंद झाले आहेत.

स्वारगेट परिसरात सकाळापासून कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना माघारी फिरावे लागत आहे. स्वारगेट आगारातच कर्मचारी एसटी जागेवरच लावून आंदोलनाला बसले आहेत. शिवाजीनगर भागातही अशीच परिस्थिती असल्याचे चित्र सकाळी दिसून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक आगारात कर्मचारी आत्महत्या करीत आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना बळजबरीने कामावर पाठविले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संघटना आता संपाच्या मानसिकतेत नव्हते. मात्र कर्मचाऱ्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत कालच पुण्यातील राजगुरूनगर, नारायणगाव, व इंदापूर हे आगार बंद केले. त्यामुळे कृती समितीला देखील त्याची दखल घ्यावी लागली. कृती समितीने सोमवारी मुंबईत सर्व संघटनेच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे उतरणार

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. २९ ऑक्टोबरला औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आदेश दिले होते. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासोबतच अनेक दुर्देवी घटना घडत आहेत. एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.

आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्र काढून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात म्हटलंय की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे असं त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button