ठाणे : कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी झाल्याने वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. उल्हास नदीला पूर आला आहे. बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अॅलर्ट झालं आहे.
कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासात १७७ मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. रात्री नऊ वाजता २.५ मीटरची भरती येणार आहे. त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
तब्बल ४०० गाड्या पाण्याखाली
दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत ३० मुबईकरांचा जीव घेतला आहे. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलं आहे. असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतील कांदिवली भागात. एक नाही, दोन नाही, तर तब्बल ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या.
मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या ४०० पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला. वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की आपण कशासाठी पैसे मोजले होते? असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार.
वालधूनीचं पाणी घरात
अतिवृष्टीमुळे कल्याणच्या वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील वालधूनी, अशोकनगर, शिवाजी नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो लोकांना इतरत्रं हलविण्यात आलं आहे.
डोंबिवलीत हिरवा नाला
डोंबिवलीत एका केमिकल कंपनीने नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा गार झाला होता. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी या कंपनी विरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एमआयडीसीकडून रायबो कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आहे. प्रदूषण मंडळाने कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
कल्याणी येथे रस्ता खचला
कल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.
काळू नदीवरील पूल पाण्याखाली
टिटवाळ्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे, अशी माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे.
अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात नदीला पूर
अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधूनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. वालधुनी नदी अंबरनाथ जवळच्या तावलीच्या डोंगरात उगम पावते. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहीत झाले असून या नदीत पाण्याचा मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहत असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अगदी बाजूनेच वालधुनी नदी वाहते. या नदीला आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे काही काळासाठी शिवमंदिरात जाणारे पूल सुद्धा पाण्याखाली गेले होते. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. त्यामुळे नदीचा प्रवाह सुद्धा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून त्यामुळे वालधूनी नदीला पूर आला आहे.
मुंब्र्यात प्लॅन सिटीत कमरेएवढे पाणी
ठाण्यातील मुंब्र्याजवळ एमएमआरडीए आणि एमएसआरडीएकडून सुरू असलेल्या प्लॅन सिटीमध्ये कमरे एवढं पाणी साचलं आहे. या प्लॅनसिटीचा आराखडा शहर विकास खात्याकडून तयार केला जात आहे. परंतु या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. या प्लॅनसिटीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठेही क्रॉसिंग कलवर्ट नाही. जर हे कलवर्ट थेट खाडीत सोडले तर अशी परिस्थिती ओढवणार नाही.
या भागात पाणी साचल्यानंतर ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी विभागाची पाहणी केली. यावेळी मुंब्रा कौसा हे जुने शहर आहेत त्यामुळे अशा स्थितीमध्ये पाणी भरणं समजू शकतो. परंतु महापालिका आणि एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या प्रोजेक्ट प्लॅनमध्ये पाणी साचणे ही शहर विकास खात्याची चूक आहे. करोडो रुपये खर्च करून नियोजन नाही. लोकांच्या जीवाकडे कानाडोळा करून ही प्लॅनसिटी तयार केली जात असल्याचा आरोप पठाण यांनी केला. तसेच या ठिकाणी एमएमआरडीए, एमएसआरडीए आणि शहर विकास खात्याने संयुक्त सर्वे केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
मानपाड्यात भिंत कोसळली
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भागात कॉसमॉस इमातीची संरक्षण भिंत कोसळून 5 चार चाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यकरत आहे. या दुर्घनटेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तर,ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच रस्त्यावर प्रचंड पाणी साचले आहे. मुख्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना वाट काढणे कठीण जात होतं. ठाण्यात सकाळी एका तासात 42 मिली मीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे तलावपाळी परिसर जलमय झाला होता. तलाव पूर्ण भरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे.
मुंब्रा-पनवेल महामार्ग बंद
मुंब्रा, शिळफाटा व पारसिक डोंगररांग येथे मुसळधार पाऊस झाल्याने मुंब्रा-पनवेल हायवेवर पाण्याचा प्रवाह आला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंब्रा शिळफाटा परिसरातील तसंच या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन ठाणे पोलिसांनी केलं आहे.
विरार पूर्वेला पांढरतारा नदीला पूर; पूल पाण्याखाली, रस्ताही खचला
विरार पूर्वेचा भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. पांढरतारा नदीला पूर आल्याने उसगाव भाताने आणि त्यापलीकडे १० ते १२ गावांना जाणारा रस्ताही खचला आहे. त्यामुळे भाताने, नवसई, आडणे, थळ्याचा पाडा अशा प्रमुख गावच्या राहिवाशांना आता २५ किलोमीटरचा वळसा घालून गाव गाठावे लागत आहे.
कळव्याच्या न्यू शिवाजी नगर परिसरात कंबरे एवढे पाणी, नागरीक हतबल
ठाणे जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कळवा पुण्यातील न्यू शिवाजी नगर या परिसरात कमरे एवढं पाणी साचले आहे. या शिवाजी रोड शेजारील एक भला मोठा नाला आहे. नाला ओसंडून वाहू लागल्याने परिसरात कमरे इतके पाणी साचले आहे. या कमरे इतक्या पाण्यात काही तरुण मस्ती करताना पहायला मिळाले. तर लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदार त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कळव्याच्या घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळली, चार घरांचे नुकसान
ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले, यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटना स्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.
माथेरानमधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन; संपर्क तुटला
माथेरान घाटात दरड कोसळून भुसख्खलन झाले आहे. नेरळ ते माथेरानला जाणाऱ्या घाटातील एकमेव मार्गावर मोठ-मोठाली दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने माथेरानकडे जाण्यायेण्याचा संपर्क तुटला आहे.
पावसात नसतं धाडस नको !
सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक वाहनांना जलसमाधी मिळाली आहे. वसईत पावसाच्या पाण्यात वाहून चाललेल्या कारला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलंय. वसईत सनसिटी रोडवर कंबरेऐवढं पाणी साचलं होतं. मात्र एकानं नसती उठाठेव करत साचलेल्या पाण्यात कार चालवण्याचं नसतं धाडस दाखवलं. गाडी रस्ता सोडून जात असल्याचं समजताच स्थानिकांनी धाव घेत कारला बाहेर काढलं, तर तिकडे बेलापूर गावात तलावाच्या बाजूनं कार वळवताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक कार तलावात पडली. सुदैवानं कारमधील तिघांनी लगेच बाहेर उड्या टाकल्या त्यामुळे जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीनं कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.