परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे केलेले आरोप चांगलेच गाजत आहेत. यासंदर्भात परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवार, दि. २४ मार्चला सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांचा समावेश असलेलं सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ उद्या मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
अँटेलिया स्फोटकं प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली केलेल्या शासनाच्या आदेशालाही आव्हान दिलेय. तसेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून केलेली बदली बेकायदेशीर असल्याने रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आलीय.
परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे. अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी ACP सचिन वाझे आणि ACP संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं. त्यापूर्वी 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये , रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.