Top Newsआरोग्य

ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत घातक व्हेरिएंटचा प्रसार

नवी दिल्ली : ‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. खरे तर, तज्ज्ञांनी हा विषाणू डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे, कारण हा आतापर्यंतचा सर्वाधिक म्यूटेटेड व्हर्जन असल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहरणच द्याचे तर यात डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्यूटेशन आढळून आले आहे. यामुळेच, या स्वरूपाची पहिली काही प्रकरणे समोर येताच जागतिक आरोग्य संघटनेने याला व्हेरिएंट ऑफ कंसर्न असल्याचे सांगितले होते.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. कारण, दक्षिण आफ्रिकेने हा व्हेरिएंट पहिल्यांदा २४ नोव्हेंबर रोजी उघड केला, तर २६ नोव्हेंबरपर्यंत ओमिक्रॉन ५ देशांमध्ये पसरला होता. आता २८ नोव्हेंबरपर्यंत, तो किमान ११ देशांमध्ये समोर आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉन प्रकार या देशांव्यतिरिक्त आणखी डझनभर देशांमध्ये पसरला आहे आणि त्याची प्रकरणे हळूहळू समोर येतील. म्हणजेच ओमिक्रॉनचा कहर इतर देशांमध्येही लवकरच पाहायला मिळेल.

भारताने मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर प्रतिबंध लादले होते. पण भारतीय नागरिकांना परदेशात पाठविण्यासाठी अथवा तेथून भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘एअर बबल’ अंतर्गत उड्डाणे चालविण्यासाठी काही देशांशी करार केला आहे. या कराराअंतर्गत, भारत संपूर्ण सावधगिरीने जगभरातील काही महत्त्वाच्या देशांच्या विमानांची वाहतूक निश्चित करतो. सध्या भारताचे ३१ देशांसोबत एअर बबल करार केला आहे. अर्थात, या देशांतील लोक भारतात ये-जा करू शकतात.

आतापर्यंत कोठे-कोठे आढळला हा व्हेरिएंट?

कोरोना व्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आतापर्यंत आफ्रिकेपासून युरोपपर्यंतच्या देशांमध्ये आढळून आला आहे. असे मानले जाते की त्याची उत्पत्नी बोत्सवानामध्ये झाली, पण या व्हेरिएंटशी संबंधित पहिले प्रकरण शोधनारा पहिला देश दक्षिण आफ्रिका आहे. या व्हेरिएंटसंदर्भात इतर देशांनी प्रवासाचे निर्बंध जारी करण्यापूर्वी, तो यूके, बेल्जियम, जर्मनी, इस्रायल, झेक प्रजासत्ताक, इटली, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून आला आहे. नेदरलँड्समध्ये याच्याशी संबंधित दोन प्रकरणांची अद्याप पुष्टी झालेली नाही.

यांपैकी, ब्रिटन, जर्मनी आणि नेदरलँड्स या तीन देशांसोबत भारताचा एअर बबलअंतर्गत उड्डयन सेवा सुरू ठेवण्याचा करार आहे. यामुळे भारताकडून या तीनही देशांतून येणाऱ्या फ्लाइट्सवर विशेष लक्ष दिले जात आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोनाच्या नव्या स्वरूपाचा धोका लक्षात घेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button