ओबीसी आरक्षण : चंद्रकांत पाटलांचे समोरासमोर चर्चेचे आव्हान राष्ट्रवादीने स्वीकारले !
कोल्हापूर : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर शनिवारी भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरला हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जर भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले असा आरोप होत असेल, तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर चर्चा होऊ दे, किमान त्यानंतर तरी जनतेच्या लक्षात येईल की ओबीसी आरक्षण नेमकं कुणामुळे रद्द झालं.
चंद्रकांत पाटलांच्या या उत्तराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजप सरकारच्या पाच वर्षातील नाकर्तेपणामुळे समाजाचं आरक्षण कसं गेलं आणि समाज रस्त्यावर कसा आला याचे पुरावे मंत्री भुजबळ यांच्याकडे आहेत. त्यामुळे चर्चा होऊनच जाऊदेत, आम्ही तयार आहोत, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आव्हान स्वीकारल्याचं मुश्रीफ म्हणाले.