पृथ्वीराज चव्हाण-हर्षवर्धन पाटील भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा

कराड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी भाजपा नेते आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळपास दीड तास वेळ चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं, असं सांगत पाटील यांनी ठाकरे सरकारकडे मराठा समाजातील तरुण वर्गासाठी महत्वाची मागणी केली आहे.
मराठा आरक्षण, पद्दोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं. आता आरक्षणाला वेळ लागत असेल तर मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी आणि शैक्षणिक सुविधेसाठी काही पर्यायी व्यवस्था करता येते का हे सरकारनं तातडीने पाहावं अशी मागणी पाटील यांनी केली.
मराठा आरक्षण प्रश्नी हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते सर्व पक्षीय मराठा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यात थोडेफार काही बदल केले आणि ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले. याचिकेकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन महिन्यापूर्वी निकाल लागला आणि मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं. आता आरक्षणाला वेळ लागत असेल तर मराठा समाजातील मुलामुलींच्या नोकरी आणि शैक्षणिक सुविधेसाठी काही पर्यायी व्यवस्था करता येते का? हे राज्य सरकारनं पाहावं, अशी मागणी पाटील यांनी केली.